रत्नागिरी जिल्ह्यातील सहा बालगृहांतील मुला-मुलींचा आनंद मेळावा उत्साहात संपन्न
राजापूर (प्रतिनिधी) : अनाथ आणि निराधार मुलांच्या आयुष्यात मायेची ऊब निर्माण व्हावी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलावे आणि त्यांनाही सण-उत्सवांचा आनंद कुटुंबातील सदस्यांप्रमाणे अनुभवता यावा, या उदात्त सामाजिक भावनेतून वात्सल्य मंदिर संस्था, ओणी यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील सहा बालगृहांमधील एकूण १४५ मुला-मुलींसाठी भव्य आनंद मेळावा व भाऊबीज सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी वात्सल्य मंदिर, बालकाश्रम, ओणी येथे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदी आणि भावनिक वातावरणात पार पडला.
अनाथ मुलांच्या आयुष्यातील एकाकीपणा दूर करून त्यांना समाजाच्या प्रेमाची, आपुलकीची आणि आपल्या माणसांच्या सहवासाची जाणीव करून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या आनंद मेळाव्यात मुला-मुलींनी विविध उपक्रमांचा आनंद घेतला. भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांना प्रेम, स्नेह आणि मायेची अनमोल भेट देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी मुलांशी संवाद साधत त्यांच्या आनंदात सहभागी होत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक मान्यवर, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, दानशूर व्यक्ती, पत्रकार बांधव तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील विविध स्तरांतील व्यक्तींनी एकत्र येत अनाथ मुलांसाठी दाखविलेला जिव्हाळा आणि सहकार्य यामुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने माणुसकीचा उत्सव ठरला.
१८ वर्षांनंतरही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी संपणार नाही; तर्पण फाउंडेशनचा पुढाकार!
या कार्यक्रमातील सर्वांत महत्त्वपूर्ण आणि मुलांच्या भविष्याला नवी दिशा देणारी घोषणा तर्पण फाउंडेशन, मुंबईचे संचालक अभय अशोक तेली यांनी केली.
बालगृहामध्ये राहणाऱ्या मुला-मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना अनेकदा पुढील शिक्षण, निवास, भोजन आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. वयाची १८ वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांच्या स्वप्नांचा आणि शिक्षणाचा प्रवास थांबता कामा नये, या भावनेतून अभय तेली यांनी सर्व बालगृहांतील मुलांना विशेष आवाहन केले.
यापुढे बालगृहातून बाहेर पडणाऱ्या १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुला-मुलींना त्यांच्या आवडीनुसार उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण किंवा त्यांना हवे असलेले शिक्षण घेण्यासाठी तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण फी, राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची जबाबदारी फाउंडेशनच्या माध्यमातून स्वीकारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यासाठी कितीही खर्च आला तरी मुलांचे शिक्षण अपूर्ण राहू देणार नाही, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.तर्पण फाउंडेशनचे एमडी तथा विधानपरिषदेचे आमदार माननीय श्रीकांत भारतीय यांच्या माध्यमातून या सामाजिक उपक्रमाला बळ मिळणार असून, बालगृहातून बाहेर पडणाऱ्या मुलांना केवळ आधारच नव्हे, तर स्वतःच्या पायावर उभे राहून समाजात सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.
‘तुमच्या दातृत्वामुळेच अनेक अनाथ मुलांचे आयुष्य घडले!’ – डॉ. महेंद्र मोहन
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन यांनी उपस्थित दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजातील सर्व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे मनापासून आभार व्यक्त करत सर्वांच्या ऋणात राहण्यासाठी सर्वांसाठी ऋण निर्देश – सन्माननीय दातृत्वशील व्यक्तिमत्त्वाचा गौरव या कार्यक्रमातून आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, समाजातील आपल्यासारखे दातृत्ववान लोक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, म्हणूनच अनेक अनाथ मुलांना शिक्षणाची, चांगल्या संस्कारांची आणि आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळाली. आपल्या सहकार्यामुळे असंख्य मुलांचे जीवन घडवता आले. या ऋणातून आम्ही आयुष्यभर उतराई होऊ शकणार नाही, अशी कृतज्ञतापूर्ण भावना त्यांनी व्यक्त केली.
केवळ आनंद मेळावा नव्हे, तर माणुसकीच्या नात्यांचा सुंदर उत्सव!
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जीवनशैलीमध्ये स्वतःच्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता समाजातील वंचित, अनाथ आणि निराधार मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी अनेक हात एकत्र येणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. वात्सल्य मंदिर संस्थेने आयोजित केलेला हा आनंद मेळावा केवळ भाऊबीजेचा कार्यक्रम नसून, अनाथ मुलांना समाजाने दिलेली प्रेमाची आणि आपुलकीची ग्वाही होती. या मुलांच्या आयुष्यातील आजचा आनंद उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा पाया ठरावा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि प्रत्येक मुलाने शिक्षणाच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करावी, हाच या उपक्रमामागील खरा हेतू आहे.
अनाथ मुलांना केवळ आधार देणे पुरेसे नाही, तर त्यांना शिक्षण, संधी आणि स्वाभिमानाने जगण्याची ताकद देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, याची जाणीव करून देणारा हा आनंद मेळावा रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला.वात्सल्य मंदिर, ओणी संस्थेचे सर्व पदाधिकारी, हितचिंतक – देणगीदार, आजी माजी विद्यार्थी या सर्वांनी उस्फुर्त सहभाग घेऊन बालगृहातील विद्यार्थांचा आनंद द्विगुणित केला.












