श्री देव रवळनाथाच्या कौलाने मुहूर्त निश्चित
गाव होणार निर्मणूष्य गुरे-ढोरे, कुत्रे-मांजरांसह संपूर्ण गाव जाणार वेशीबाहेर
आचरा (प्रतिनिधी) : तीन दिवस गावाला कुलूप, वेशीबाहेर संसार आणि निसर्गाच्या सान्निध्यात सामूहिक आनंदाची पर्वणी! शेकडो वर्षांची परंपरा जपणारे चिंदर गाव पुन्हा एकदा ऐतिहासिक गावपळणीसाठी सज्ज झाले आहे. श्री देव रवळनाथाच्या कौलाने गावपळणीचा मुहूर्त निश्चित झाला असून, येत्या २ डिसेंबर २०२६ पासून संपूर्ण चिंदर गाव तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी वेशीबाहेर जाणार आहे. घराघरांत तयारीची लगबग सुरू होणार असून, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण आपल्या गुरे-ढोरे, कुत्रे, मांजरे, कोंबड्या आणि संसारोपयोगी साहित्यांसह गावाबाहेर मुक्कामाला जाणार आहेत. सुमारे साडेसात हजार लोकसंख्येचे चिंदर गाव या काळात पूर्णपणे निर्मनुष्य होणार असल्याने या अनोख्या परंपरेची पुन्हा एकदा सर्वत्र चर्चा रंगणार आहे.
समस्त चिंदरवासीयांना उत्सुकता लागून राहिलेल्या या ऐतिहासिक गावपळणीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज बुधवार २५ नोव्हेंबर रोजी बारापाच मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री देव रवळनाथाचा कौल-प्रसाद घेण्यात आला. देवाने गावपळण होण्यासाठी कौल दिला असून त्यानुसार देवाच्या हुकुमानुसार प्रथेप्रमाणे २ डिसेंबर २०२६ पासून गावपळणीला सुरुवात होणार आहे.
दर तीन ते पाच वर्षांनी पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या या गावपळणीचे चिंदरवासीयांसाठी विशेष महत्त्व आहे. गावपळणीच्या काळात ग्रामस्थ आचरा, त्रिंबक, मसुरे, वायंगणी, बांदिवडे आदी परिसरांत गावाच्या सीमेबाहेर राहुट्या उभारून तीन दिवस वास्तव्यास राहणार आहेत. विशेष म्हणजे या परंपरेत हिंदू बांधवांसोबतच ख्रिश्चन समाजातील ग्रामस्थही तितक्याच उत्साहाने सहभागी होतात. सर्वधर्मीय एकोपा आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवणारी चिंदरची गावपळण ही कोकणच्या सांस्कृतिक वैभवातील एक अनोखी परंपरा ठरली आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात गावपळणीच्या निमित्ताने संपूर्ण गावाला एकत्र येण्याची आणि तीन दिवस निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने राहण्याची संधी मिळते. दैनंदिन कामकाज, व्यवसाय आणि धावपळीतून विरंगुळा मिळत असल्याने ग्रामस्थ या काळात संगीत, भजने, गप्पागोष्टी आणि विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांत रममाण होतात. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हा काळ आनंदोत्सवापेक्षा कमी नसतो.
आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही शेकडो वर्षांची परंपरा श्रद्धेने जपणारे चिंदरवासीय गावपळणीच्या माध्यमातून आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करत आहेत. श्रद्धा, देवावरील विश्वास, परंपरा, सामाजिक एकोपा आणि सामूहिक आनंद यांचा अनोखा संगम असलेली ही ऐतिहासिक गावपळण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी संपूर्ण चिंदर गाव सज्ज झाले आहे. २ डिसेंबर २०२७ पासून तीन दिवस गावाची वेस ओलांडून वेशीबाहेर भरणारा हा अनोखा संसार कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचे वेगळेपण अधोरेखित करणार आहे.










