वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील वीज वीज वितरण कंपनीच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्याचे सोडून तालुक्यातील ग्राहकांचा विरोध असतानाही, ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. तरी यापुढे कोणत्याही गावात स्मार्ट प्रीपेड मीटर बसू नयेत. अन्यथा येत्या आठ दिवसात वैभववाडी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी उप अभियंता वीज वितरण कंपनी वैभववाडी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये गजलेल्या पोलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सध्या पावसाळ्यामध्ये जोरदार वारा व पावसामुळे विद्युत पोल पडून जीवित हानी होण्याची शक्यता आहे. याबाबत आपल्या विभागाचे लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच तालुक्यातील विद्युत कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या जागी बदली कर्मचारी रुजू होत नाही. तोपर्यंत बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करू नये. वैभववाडी तालुक्यात आपल्या विभागाचा गलथान कारभार सुरु आहे. त्यामुळे जनतेतुन उद्रेक होऊ शकतो तरी याबाबत येत्या आठ दिवसात लेखी उत्तर देण्यात यावे अन्यथा आठ दिवसानंतर वैभववाडी वीज वितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लोके यांनी दिला आहे. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर,अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख जावेद पाटणकर, तिरवडे सरपंच जितेंद्र तळेकर, उपविभाग प्रमुख विलास पावसकर,शाखाप्रमुख अनंत नांदोस्कर,माजी सरपंच राजाराम गडकर, ओमकार इस्वलकर, दीपक पवार आदी उबाठा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.












