कोल्हापूर (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित, फोंडाघाट यांच्या १८ व्या शाखेचा उद्घाटन सोहळा राधानगरी येथे उत्साहात पार पडला. वैश्य समाजाचे अध्यक्ष वसंतराव केरकर यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष गणपत वळजू यांच्या उपस्थितीत पार पडला.कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शाहू महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक दिलीप पारकर यांनी केले.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत सांगितले की, गेल्या 34 वर्षांत सिंधुदुर्गसह कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यात सभासदांचा विश्वास संपादन करून संस्थेने आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. अल्पावधीतच संस्थेने गरुडभरारी घेतली असून, व्यवसाय वृद्धीसाठी सर्वांनी सहकार्य करावे. सभासदांचे हित जपण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार संस्थेमार्फत आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये इंटरनेट व मोबाईल बँकिंग, आरटीजीएस, एसएमएस सेवा, क्यूआर कोड सुविधा, ऑनलाइन प्रिंटिंग सेवा, संस्थेचे पे ॲप तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच पैसे देण्याची सुविधा यांचा समावेश आहे. सहकाराच्या माध्यमातून संस्थेची प्रगती साधण्यासाठी व्यापारी व सभासदांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
व्यापारी संघटनेचे संतोष कावळे यांनी व्यापाऱ्यांनी संस्थेत खाते उघडून संस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी संजय पारकर, प्रकाश कानकेकर, अभिजीत कांदळकर, प्रकाश महाडेश्वर आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी वैश्य समाजातील जेष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करण्यात आला,
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष गणपत वळंजू संचालक दिलीप पारकर, गणपत पारकर,उमेश वाळके ,अनिता रेवडेकर तसेच दाजीपूरच्या सरपंच श्रीम.प्रतिभा कोरगावकर, आरती तायशेटे, सीमा मोरये, गणेश लाड, आनंदा पोवार, संजय पारकर, संतोष तायशेटे, डॉ. सुभाष इंगवले, दादासो सांगावकर, राम कदम, जयसिंग म्हापसेकर, शांताराम कानकेकर, सचिन लाड ,श्री माळकर यांच्यासह संस्थेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सौ ज्योत्स्ना पिळणकर,प्रशासन प्रमुख मोहन मोदी,पल्लवी पावसकर, हितचिंतक, खातेदार, सभासद यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.आभार अनिता रेवडेकर यांनी मानले.












