ट्रक जप्त ; बीडच्या भारत जाधवला केली अटक
बांदा (प्रतिनिधी) : बांदा पोलीस चेकनाका येथे बांदा पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री मोठी धडक कारवाई केली. ट्रकमधून बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाणारी तब्बल १ कोटी २५ लाख रुपयाची गोवा बनावटीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवाईत दारूसाठा आणि ट्रक असा एकूण १ कोटी ३६ लाख ६० हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भारत संदीपान जाधव (वय ३१, सध्या रा. वाघोली, पुणे शहर; मूळ रा. मौजवाडी, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास बांदा चेक नाका येथे पोलिसांनी संशयास्पद ट्रकला (MH 27 BX 9099) अडवले. या ट्रकची कसून झडती घेतली असता पोलिसांना आतमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स लपवून ठेवल्याचे आढळून आले.
या कारवाईत १ कोटी २१ लाख ६० हजार ७१६ रुपयांची दारू व सुमारे १५ लाख रुपयांचा ट्रक असा एकूण १ कोटी ३६ लाख ६० हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.












