विद्यार्थ्यांच्या अभिनयातून मूल्यशिक्षणाचा संदेश; विद्या मंदिर मांगवली नं. 1 मध्ये ‘भूमिती’ शॉर्ट फिल्मची निर्मिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील विद्या मंदिर मांगवली नं. 1 या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षणाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘भूमिती’ या 35 मिनिटांच्या मूल्याधारित शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव देणारा हा अभिनव उपक्रम ठरला आहे.

या शॉर्ट फिल्ममध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. मुख्य भूमिकांमध्ये युवराज गांधी, समृद्धी गव्हाणकर, श्रीपाद जावडेकर तसेच शाळेचे शिक्षक संजय पाटील यांनी प्रभावी अभिनय साकारला आहे. तर सहायक भूमिकांमध्ये रेषाबाई नागिले व राहुल नांदूरकर यांनी योगदान दिले असून पाहुण्या कलाकार म्हणून ज्योत्स्ना पाटील यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे.

या शॉर्ट फिल्मचे प्रोडक्शन ‘नुस्ती फिल्म’ यांनी केले असून दिग्दर्शनाची जबाबदारी राज गांधी यांनी सांभाळली आहे. सहाय्यक म्हणून आर्यन वारंग, वरुण अपरांदे, हर्ष अपरांदे, अमित बने आणि नक्षत्र देशपांडे यांनी परिश्रम घेतले आहेत. दिग्दर्शक व संपूर्ण टीम FTNMP या अभ्यासक्रमांतर्गत ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथे शिक्षण घेत असून त्यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.
चित्रपट निर्मिती प्रक्रियेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, गावचे सरपंच शिवाजी नाटेकर, तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत असून भविष्यातही अशा शैक्षणिक व सांस्कृतिक प्रयोगांना प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!