प्रशासन कामात सदैव सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांकडून झालेला सत्कार पुढील वाटचालीत ऊर्जा देणारा- संतोष सावंत
फोंडाघाट प्रतिनिधी) : प्रशासनाच्या महसूल विभागासारख्या, गोरगरिबांच्या सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत संपर्क येत असताना, जनतेने कार्यकाळात नेहमीच सहकार्य केले. काही अपरिहार्य बाबी टाळल्यास, प्रशासनाकडून जनतेशी संपर्क ठेवताना, कायद्याचे मार्गदर्शन आणि सहकार्याची वागणूक यामुळे आजचा सत्कार मला पुढील वाटचालीस सदैव ऊर्जा देणारा ठरेल, असे भावोद्गार तलाठी संतोष सावंत यांनी काढले. तलाठी संतोष सावंत यांचा ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळ, शाल, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडल अधिकारी प्रवीण मोंडे, सोसायटी चेअरमन राजन नानचे, संतोष मडवी, राजेश शिरोडकर, सुरेश टक्के, विजय मुळेकर, राजू पावसकर, राजेंद्र मोरये, विजय जामदार, राजेंद्र मरये, शितल पारकर, पांडुरंग राणे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवली तालुक्यातील फोंडाघाटसारख्या महत्त्वाच्या सज्जावर काम करताना सर्वांना विश्वासात घेऊन, सहकार्याच्या भावनेतून संतोष सावंत यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यामुळे कार्यालयात आलेला पक्षकार समाधानानेच परत जात असे. योग्य मार्गदर्शन आणि कामाचा निपटारा यामुळे अल्पावधीत यांनी संवेदनशील सज्जावर आपला ठसा उमटवला, अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. राजेश शिरोडकर यांनी आभार मानले.












