विद्यार्थ्यांनी वाचन व व्यायामाची नशा बाळगावी- सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले

अर्जुन रावराणे विद्यालयात अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी) : आज २६ जून सर्वत्र शाळा महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे वैभववाडी पोलिस ठाण्याच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांसह सर्वानी अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली. प्रशालेच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.विद्यार्थ्यांनी शालेय जिवनात मोबाईलची नशा बाळगून नये. मोबाईल वापरातून गुन्हात वाढ होत आहे . सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या गोष्टींची कोणतीही खात्री न करता ते आपण प्रसारित करतो हे चुकीचे आहे. अर्धवट ज्ञान चुकीचे असते. वाईट गोष्टीची सवय लागायला वेळ लागत नाही. नशेचा परिणाम आपल्या आरोग्यावर जिवनमानावर होतो. अंमली पदार्थांपासून विद्यार्थ्यांनी लांब रहावे. विद्यार्थ्यांनी आपल्या जिवनात वाचनाचे व व्यायामाचे व्यसन लावावे परिणामी शरिर व मन निरोगी राहील असे मत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या मनोगतात सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले यांनी व्यक्त केले. पोलिस हवालदार आरती राठोड यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

वैभववाडी शहरातून अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थी व वैभववाडी पोलिस ठाण्याच्या स्टाफ च्या वतीने रॅली काढण्यात आली. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पोलिस कॉन्स्टेबल आरती राठोड यांच्यासह प्रशालेचे सर्व शिक्षक,सर्व पोलीस स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशालेचे शिक्षक शिंदे एस.बी. यांनी केले.

error: Content is protected !!