अंध-अपंग आणि रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मिळणार या उपक्रमाचा आधार

वैभववाडी (प्रतिनिधी) : ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ या ब्रीदवाक्यास अनुसरून वैभववाडी येथील राजेश मोतीराम पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट गेली कित्येक वर्षे वैभववाडी तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. ट्रस्ट च्या माध्यमातून आज गुरुवार दि. ०३ जुलै, २०२५ पासून ‘कॉल टू हेल्प’ सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत अंध अपंग व्यक्तींना मोफत वैद्यकीय कामी प्रवासासाठी खांबाळे येथील रिक्षा व्यावसायिक श्रीकृष्ण पवार यांनी आपल्या रिक्षा व्यवसायाच्या निमित्ताने गरजू अंध अपंग व्यक्तींना वैद्यकीय कामी प्रवासासाठी मोफत रिक्षा उपलब्ध करून देत रूग्ण सेवा करण्याचा निर्धार केला आहे. तर वैभववाडी येथील हॉटेल व्यावसायिक हॉटेल पै. प्रकाश चे मालक संजय साळसकर हे महिला भगिनींच्या प्रसुतीच्या काळात त्यांच्या लहान बाळास दवाखान्यात दुधाची मोफत सेवा देणार आहेत. आपल्या 9869389297 या संपर्क क्रमांकावर गरजूंना संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. याबरोबरच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने रुग्णांना रक्ताची गरज लागल्यास मदतीसाठी ‘कॉल टू हेल्प’ या उपक्रमांतर्गत वैभववाडी तालुक्यातील सर्व दवाखाने, वैद्यकीय कक्षात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान च्या संपर्क क्रमांकाची यादी चिकटविण्यात आली आहे.

यावेळी राजेश मोतीराम पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष तथा सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे तालुकाध्यक्ष राजेश पडवळ, मैत्रेय दिव्यांग संघटनेचे वैभववाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र कदम, वैभववाडी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्जुन नरोटे, राजेश मोतीराम पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे सचिव मंदार चोरगे, खजिनदार मंगेश चव्हाण, रिक्षा व्यावसायिक श्रीकृष्ण पवार, हॉटेल व्यावसायिक संजय साळसकर, रुपेश वारंग व संस्थेचे पदाधिकारी, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते. ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘कॉल टू हेल्प’ या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.












