खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कक्ष, अजीवन अध्ययन व विस्तार विभाग, राष्ट्रीय कैडेट कोर (एनसीसी) आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेची पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर रश्मी देसाई यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले. त्यांनी आपल्या भाषणात टिळकांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानासोबतच त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी टिळकांच्या विचारांचे स्मरण करून दिले आणि उपस्थितांना राष्ट्रनिष्ठा, शिस्त, आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवण्याचा संदेश दिला. “न्याय, राष्ट्रप्रेम आणि जागृती ही टिळकांची शिकवण आजच्या तरुणांनी अंगीकारण्याची गरज आहे.” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनसीसी विभाग प्रमुख गजानन व्हंकळी यांनी केले. सूत्रसंचालन हर्षाली कानडे यांनी तर आभार प्रदर्शन एनएसएस कार्यक्रमाधिकारी वसीम सय्यद यांनी केले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती.










