पूर्ण प्राथमिक शाळा शिरवल नं. १ येथे प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना रेनकोट आणि वह्या वाटप
प्राणजीवन सहयोग संस्थेचे उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद
कणकवली (प्रतिनिधी) : प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी आपली आई राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ शिरवल येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरवल नं. १ येथे प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना रेनकोट आणि मोफत वह्या वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांच्या दातृत्वाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन मुख्याध्यापक सुशिल गोसावी यांनी केले.
प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरवल नं. १ येथे नुकताच विद्यार्थ्यांना रेनकोट आणि वह्या वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सुशिल गोसावी बोलत होते. यावेळी प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल, सिंधुदुर्गच्या वतीने शाळा शिरवल नं. १, प्राथमिक शाळा खासकीलवाडी, तळेवाडी आणि गाडेसखलवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना एकत्रितपणे रेनकोट वाटप आणि वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपसरपंच प्रविण तांबे, पोलिस पाटील सुशिल तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरुनाथ मेस्त्री, तुळशीदास कुडतरकर, माजी सरपंच मनोज राणे, प्राणजीवन सहयोग संस्थेचे कणकवली तालुका प्रतिनिधी प्रशांत गावडे, प्राणजीवन सहयोग संस्थेचे सदस्य अनिप सावंत, चंद्रशेखर सावंत, अरुण चौकेकर, मंगेश तांबे, शिक्षक पांडुरंग मोरये, उदय जाधव, शिक्षिका शितल राणे, कविता पावसकर, स्वाती केंद्रे, सविता आर्लेकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना सुशिल गोसावी म्हणाले की, संदीप चौकेकर यांनी प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने सलग सात वर्षे कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्य विषयक उपक्रम राबवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाडी आणि पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले असून निश्चितच प्राणजीवन सहयोग संस्थेने विद्यार्थ्यांना पावसाळ्यात एक चांगली भेट दिली आहे. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून संदीप चौकेकर यांनी जोपासलेले समाजसेवेचे व्रत सर्वांनाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या संस्थेचे हे उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद आहेत. जिल्ह्यातील विविध संस्था आणि मंडळांसमोर एक वेगळा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार गोसावी यांनी काढले आणि प्राणजीवन सहयोग संस्थेच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी उपसरपंच प्रविण तांबे म्हणाले की, संदीप चौकेकर हे शिरवल शाळा नंबर १ चे माजी विद्यार्थी आहेत. शाळेबद्दल आणि गावाबद्दल त्यांनी आत्मीयता जोपासली आहे. आपण शाळेचे आणि गावाचे देणे लागतो, हिच मातृभुमीशी त्यांनी जोपासलेली बांधिलकी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. प्राणजीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून गेली सात वर्षे जिल्हाभरात शैक्षणिक साहित्य वाटप करुन त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी कविता पावसकर, सविता आर्लेकर, पांडुरंग मोरये, सुशिल तांबे, प्रशांत गावडे यांनी संदीप चौकेकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.











