नियमित अभ्यास, शिस्तबद्ध जीवन, आत्मविश्वास, गुरु पालकांचा आदर करा- गणेश रासने

वैभववाडी (प्रतिनिधी) : जीवनात यशस्वी होण्यासाठी नियमित अभ्यास, शिस्तबद्ध जीवनशैली, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार, गुरु व पालकांचा आदर या चार मुलमंत्राचा अवलंब करा, असे प्रतिपादन प्रणव तीर्थ ट्रस्ट पुणेचे संचालक गणेश रासने यांनी केले. कोकण विद्या प्रसारक मंडळ, मुंबई आणि प्रणव तीर्थ ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मधुकर सीताराम भुर्के माध्यमिक विद्यालय, मांगवली येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना रासने बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीधर राणे होते. उपाध्यक्ष सतीश जागुष्टे, महेश संसारे, सरपंच शिवाजी नाटेकर, पोलीस पाटील कमलाकर लिंगायत, माजी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, माजी सभापती सुवर्णा संसारे, स्मिता राणे, मुख्याध्यापिका श्रीमती भोसले, माजी मुख्याध्यापक शिवाजी पाटील, शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इयत्ता आठवी ते दहावीती गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल सर्व मान्यवरांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील गुणवंत शिक्षकांचा देखील संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष श्रीधर राणे, उपाध्यक्ष सतीश जागुष्टे व महेश संसारे, सरपंच नाटेकर यांनी संस्थेच्या चालू व भावी उपक्रमांची माहिती दिली व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शाळेचे माजी विद्यार्थी व संस्थेचे संचालक मंगेश शेलार यांचेही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये मोठे योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद कांबळे यांनी तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका श्रीमती भोसले यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

error: Content is protected !!