कणकवली (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सन २०२४ वर्षातील बालसाहित्यातील नऊ विभागात पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कादंबरीसाठी दिला जाणारा लोखंडे जोशी पुरस्कार कणकवली येथील शिक्षिका, कवयित्री, बाल साहित्यलेखिका कल्पना मलये यांच्या ‘सई’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. येत्या २ ऑगस्टला सकाळी १०.३० वा. पुणे येथील मॉडर्न कॉलेजच्या लता मंगेशकर सभागृहामध्ये ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख आणि ग्रंथ प्रसारक प्रसाद भडसावळे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

इतर पुरस्कारांमध्ये कथासंग्रह ‘चिंटू अस्वल आणि त्याचे घर’ साठी वा. गो. आपटे पुरस्कार मूर्तिजापूर येथील रवींद्र जवांदे यांना, कवितासंग्रह ‘वाऱ्या वाऱ्या आंबे पाड’ साठी ग. ह. पाटील पुरस्कार रमेश वंसकर (गोवा) यांना, किशोर कथासंग्रह ‘आबली’ साठी दयार्णव कोपर्डेकर पुरस्कार प्रमोद धायगुडे (वाघोशी खंडाळा) यांना, समीक्षा ग्रंथ ‘एकविसाव्या शतकातील बालसाहित्य’ साठी लीलाताई भागवत पुरस्कार डॉ. विठ्ठल जाधव (बीड) यांना, प्रथम प्रकाशन ‘चिमण्यांची शाळा’ साठी कारले गुरुजी पुरस्कार राजेंद्र झुंजारराव (पुणे) यांना, पुस्तक सजावट ‘वाचू गाऊ नाचू आनंदे’ साठी सर्जेराव जगताप पुरस्कार विजयकुमार चित्तरवाड (छ. संभाजीनगर) यांना जाहीर झाला आहे. तर दिवाळी अंकासाठीचा आनंद मासिक पुरस्कार ‘छावा’ दिवाळी अंकाला तर बालसाहित्य प्रकाशनासाठी दिला जाणारा बा. रा. मोडक पुरस्कार नंदिनी प्रकाशन, पुणे यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
बालसाहित्य पुरस्कारांसाठी संस्थेकडे १०० पेक्षा अधिक पुस्तके प्राप्त झाली होती. पुस्तकाचे परीक्षण प्रा. सचिन पालवे, रवीकांत आदरकर, सचिन बेंडभर व शिवाजी चाळक यांनी केले. सन्मानपत्र, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कल्पना मलये या कणकवली येथे जि. प. शाळा नं. ५ येथे उपक्रमशिल शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या ‘कारटो’ व ‘सई’ या बालसाहित्याला अनेक पुरस्कार मिळाले असून हे साहित्य बालवाचकांच्या पसंतीस उतरले आहे. त्यांना आता बालकुमार साहित्य संस्थेचा राज्य पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.











