गौरवमयी व्याख्यानाचे भव्य आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय सैन्याच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गौरव करणारा दीन म्हणजे कारगिल विजय दिवस होय. या दिनाचे औचित्य साधून खारेपाटण येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एनसीसी विभाग आणि विद्यार्थी कल्याण समिती व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक उत्साही, प्रेरणादायी आणि राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या विशेष व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालय करण्यात आले होते. खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमला शेजवली ता.राजापूर गावचे पोलिस पाटील, प्रकाश शिंदे यांनी कारगिल युद्धातील रणसंग्राम व भारतीय जवानांचे पराक्रम, शौर्य आणि मातृभूमीवरील प्रेम याबद्दल सखोल आणि भावस्पर्शी मार्गदर्शन केले. त्यांच्या शब्दांनी उपस्थितांचे मन भारावले. तर युवकांना देशप्रेमा बद्दल नव संजीवनी मिळाली. तर प्राचार्य डॉ. कांबळे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा व कर्तव्यभावना जागृत केली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक (सिंधुदुर्ग) आदरणीय प्रा. वसीम सय्यद उपस्थित होते. त्यांनी आपले ज्वलंत आणि प्रेरणादायी विचार मांडताना विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे, सामाजिक बांधिलकीचे आणि सेवाभावी वृत्तीचे मोल पटवून दिले. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रम भारदस्त आणि संस्मरणीय ठरला. यावेळी एनएसएस विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रश्मी देसाई यांनी विद्यार्थ्यांना सेवा, शिस्त आणि नेतृत्वगुणांची गरज पटवून दिली, तर प्रा. तानाजी गोदडे यांनी देशरक्षणासाठी युवकांची भूमिका स्पष्ट करत असताना कर्तव्यपरायणतेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक कुमारी सिद्धी शेलार हिने केले. तर सूत्रसंचालन कुमार प्रथमेश हरियाण याने केले. यानंतर कुमारी पवार हिने आभार प्रदर्शन केले. तर या प्रेरणादायी कार्यक्रमास महाविद्यालयातील एनएसएस, एनसीसी, सांस्कृतिक विभाग व विद्यार्थी कल्याण समितीचे समन्वयक, स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने, जवानांच्या अमर शौर्याला वंदन करून राष्ट्रसेवेची नवी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली, ही या कार्यक्रमाची जमेची बाजू ठरली.












