घरफोडीतील दोन आरोपींना कर्नाटकात ठोकल्या बेड्या ; 4 दिवस पोलीस कोठडी

कणकवली पोलिसांची दमदार कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथे 2 जून रोजी केलेल्या घरफोडीतील दोन आरोपीना कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश शेडगे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने कर्नाटक राज्यातील कारवार येथे बेड्या ठोकून कणकवलीत आणले आहे. अजीझ दादाबीर मानगुळी ( वय 28, रा कासेगाव पंढरपूर ) विवेक शिवाप्पा कुंभार ( वय 25, रा पटवर्धन कुरोली, पंढरपूर जिल्हा सोलापूर ) असे दोन्ही आरोपी आहेत. दोन्ही आरोपीना कणकवली न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अधिक माहिती अशी की 2 जून रोजी कलमठ बिडयेवाडी येथे संजय सुभाष सावंत व अन्य एकाची घरफोडी करून चोरट्यानी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरली होती. याबाबतची फिर्याद संजय सुभाष सावंत यांनी 3 जून रोजी कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती.सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन आरोपींनी घरफोडी केल्याचे दिसून येत होते. त्यातील मुख्य आरोपी लखन अशोक कुलकर्णी याला गोकर्ण कर्नाटक येथून सिंधुदुर्ग एलसीबी आणि कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने संयुक्त कारवाई करत पकडले होते. त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.या घरफोडी तील अन्य दोन आरोपी मात्र पसार होते. कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश शेडगे यांनी या गुन्ह्याचा पुढे तपास सुरू ठेवला. या गुन्ह्यातील अन्य आरोपिंची माहीती घेतली असता दोन्ही आरोपी कर्नाटक राज्यातील कारवार मध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पीएसआय शेडगे यांच्यासह पोलीस हवालदार दीपक चव्हाण कॉन्स्टेबल सुशांत कोलते, कॉन्स्टेबल संतोष कराळे 6 ऑगस्ट रोजी कर्नाटक कारवार येथे रवाना झाले होते. कारवार येथे जात दोन्ही आरोपीना पकडून कणकवली आणले.कणकवली पोलिसांच्या या दमदार कामगिरीबद्दल अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!