वैभववाडी (प्रतिनिधी) : विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी छोटे मोठे व्यवसाय उभारून स्वतःच्या पायावर उभे राहावे. यासाठी आवश्यक दाखले व परवानगीसाठी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी केले. बुद्धिस्ट आंत्रप्रेन्यूअर्स असोसिएशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (BEACI) – सिंधुदुर्ग, संघटने मार्फत तालुक्यातील महिला व अनुसूचित जाती, जमाती उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन, वैभववाडी येथे करण्यात आले होते. यावेळी पाटील बोलत होते. यावेळी गट विकास अधिकारी श्री. वालावलकर, पोलिस उपनिरीक्षक मनोज सोनवलकर, बुद्धिस्ट आंत्रप्रेन्यूअर्स असोसिएशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (BEACI) चे कार्यक्रम संयोजक ॲड. विशाल जाधव, जिल्हा अध्यक्ष हर्षवर्धन बोरवडेकर, कार्यक्रम निमंत्रक भीमराव भोसले, रवींद्र तांबे, विनोद कदम, तालुका संघटनेचे रवींद्र पवार, सुभाष कांबळे, संतोष कदम, मंगेश कांबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाला २०० हून अधिक तालुक्यातील महिला व अनुसूचित जाती जमातीतील व उद्योग करू इच्छिणारे महिला व पुरुष उपस्थित होते. गट विकास अधिकारी वालावलकर यांनी ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या संधीवर प्रकाश टाकला. कृषी आधारित उद्योग, बचत गटांचे महत्त्व आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांचा वापर करून उद्योग कसा वाढवता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. पोलिस उपनिरीक्षक (PSI) वैभववाडी मनोज सोनवलकर यांनी कोणत्याही उद्योगात कायद्याचे पालन करणे, सायबर सुरक्षेचे महत्त्व आणि शांततामय वातावरणात व्यवसाय कसा करावा, याबद्दल माहिती दिली. त्यांनी महिला उद्योजिकांना विशेषतः सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याबाबत सांगितले.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून महिलांसाठी एक महिन्याचे मोफत पिशव्या ,गाद्या तयार करण्याचे प्रशिक्षण वैभववाडी येथे सुरू झाले आहे. त्यासाठी लाभार्थी निवड जिल्हा उद्योग केंद्र व एम सी डी यांच्या मार्फत मुलाखती घेऊन काल निश्चित करण्यात आली आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वैभववाडीतील उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजक – संयोजक विशाल जाधव यांनी या सर्व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजना व वित्तीय संस्था यांच्यात समन्वय आणून तालुक्यात पहिल्या टप्प्यात त्यांना शिवण यंत्रसामग्री देऊन दीडशे पेक्षा जास्त छोटे छोटे उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात उद्योजकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, जिल्हा उद्योग केंद्र, ओरोस, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (NSIC), नॅशनल शेड्युल कास्ट शेड्युल ट्राईब हब, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, बँकेचे अधिकारी आणि इतर विविध सरकारी विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नव उद्योजकांना त्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचे, शाखा व्यवस्थापक श्री दाभोळकर, अभिषेक शिरूरकर यांनी नवोदित आणि इच्छुक उद्योजकांना मार्गदर्शन केले. यशस्वी उद्योजक हर्षवर्धन बोरवडेकर यांनी व्यवसाय यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या. यामध्ये बाजारपेठेचा अभ्यास (Market Research), ग्राहक संबंध जपण्याचे महत्त्व आणि व्यवसायात डिजिटल तंत्रज्ञानाचा (Digital Technology) वापर करण्याचे फायदे यावर त्यांनी भर दिला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रवींद्र तांबे, विनोद कदम, रवींद्र जंगम, उमेदचे सुशांत कदम, गौरी अहिर, विशाल जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.












