कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वंध्यत्व उपचारासाठी तसेच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गुरुकृपा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे याल्जस फर्टिलिटी व IVF (टेस्ट ट्यूब बेबी) सेंटर सुरू होत आहे. या सेंटरसोबतच लेझर होलोप्रोप्टोलॉजी या नवीन शस्त्रक्रिया प्रणालीचेही उद्घाटन दि. १५ ऑगस्ट, २०२५ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता करण्यात येणार आहे. याबाबत गुरुकृपा हॉस्पिटल येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यात डॉ. प्रवीण बिरमोळे आणि डॉ. शमिता बिरमोळे यांनी याविषयी माहिती दिली.
या याल्जस फर्टिलिटी व टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकासमंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून यावेळी खासदार नारायण राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, तालुका वैद्यकीय अधिकारी पूजा काळगे आणि कलमठ सरपंच संदीप मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

गेल्या २७ वर्षांपासून वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या गुरुकृपा हॉस्पिटलतर्फे या IVF केंद्रातून वंध्यत्व उपचार व टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील दाम्पत्यांना अत्याधुनिक आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. त्यासोबतच लेझर शस्त्रक्रिया प्रणालीमुळे रुग्णांना कमी खर्चात आणि जखम किंवा दुखणं न होता उपचार करता येणे शक्य झाले आहे. रुग्ण लवकर बरा होऊन घरी जाऊ शकतो. मात्र ही शस्त्रक्रिया थोडी महाग असल्याने ज्यांना शक्य आहे त्यांनी ती घ्यावी कारण या लेझर शस्त्रक्रियेचे फायदेही मोठे आहेत. गुरुकृपा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कणकवली पोलीस स्टेशनजवळ हे केंद्र कार्यरत होणार असून या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक कुटुंबांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे डॉ. प्रवीण बिरमोळे आणि डॉ. शमिता बिरमोळे यांनी सांगितले.












