सिंधुदुर्गात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही आंदोलनाचा इशारा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : दोन महिन्यांचे विद्यावेतन थकल्याने सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ११२ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी आज (शुक्रवार)पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे, वर्ग तीन व वर्ग चारच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचेही सप्टेंबर महिन्यांचे वेतन रखडल्याने त्यांनीही आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. येत्या दोन दिवसांत वेतन न मिळाल्यास काम बंद करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिल्याने जिल्ह्यातील शासकीय आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाह्य संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे साडेचारशे कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. यामध्ये लिपिक, सफाई कामगार, कक्षसेवक यांसह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांचे वेतन अद्याप अदा करण्यात आलेले नाही. काही कर्मचाऱ्यांचे दोन ते तीन महिन्यांचे वेतन थकल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून सेवा देणाऱ्या ११२ डॉक्टरांचेही गेल्या दोन महिन्यांपासून विद्यावेतन मिळालेले नाही. विद्यावेतन रखडल्याने या डॉक्टरांनी अखेर काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला. ‘विद्यावेतन नाही, तर काम नाही’ अशी भूमिका घेत त्यांनी शुक्रवारपासून आंदोलन सुरू केले आहे.

वर्ग तीन व वर्ग चारच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनीही थकीत वेतनाच्या प्रश्नावर एकत्र येत आंदोलनाची तयारी केली आहे. येत्या दोन दिवसांत वेतन जमा न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याच्या पवित्र्यात हे कर्मचारी आहेत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, संबंधित कंत्राटदार संस्थेशी चर्चा करण्यात आली असून लवकरच कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाईल, असे संस्थेकडून सांगण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

error: Content is protected !!