खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावचे सुपुत्र राजेंद्र गणपत ब्रम्हदंडे यांच्या पत्नी कैलासवासी वीणा राजेंद्र ब्रम्हदंडे यांचे नुकतेच निधन झाले मात्र राजेंद्र ब्रम्हदंडे यांनी आपल्या पत्नीचे मरणोत्तर अवयव दान करण्याचा निर्णय घेऊन समाजासाठी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तर ब्रम्हदंडे कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयामुळे समाजातील एकूण आठ लोकांना जीवनदान मिळाले आहेत. या आदर्शवत कार्याची दखल घेऊन पालमंत्री नामदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते स्वतंत्र दिनाच्या शुभनिमित्ताने राजेंद्र ब्रम्हदंडे यांचा विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्य दिन समारंभा निमित आज १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा मुख्यालय ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी राजेंद्र ब्रम्हदंडे यांनी केलेल्या कार्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी उपस्थित होते.












