“स्त्रियांनी आपल्या आरोग्य विषयक जागृत राहणे गरजेचे” – डॉ अश्विनी नवरे
खारेपाटण (प्रतिनिधी) : पुरुष हा घरचा कुटुंब प्रमुख असला तरी स्त्री ही संपूर्ण कुटुंबाला एकसंघ ठेऊन आपल्या घरची रक्षणकर्ति लक्ष्मी असते. त्यामुळे स्त्रियांनी सध्याच्या धावपळीच्या जीवनातून थोडा स्वतःसाठी वेळ काढून आपल्या आरोग्य विषयक जागृत राहणे गरजेचे असल्याचे भावपूर्ण उदगार स्त्री रोग तज्ञ रोट्रियन डॉ. आश्विनी नवरे यांनी रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या वतीने शेठ. न. म. विद्यालय येथे आरोग्य विषयक आयोजित करण्यात आलेल्या सखी संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काढले.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष रो मंगेश ब्रह्मदांडे, सचिव रो. सुबोध देसाई, खजिनदार रो. शर्मिन काझी, रो.बांदेकर सर, बांदेकर मॅडम, रो दयानंद कोकाटे, रो.सारिका महिंद्रे, रो.लक्ष्मीकांत हरियाण, रो.प्रियेशा अमृते तसेच शेठ न. म. विद्यालयाचे प्राचार्य रो संजय सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या तसेच किशोरवयीन मुलींच्या अडचणी, मासिक पाळीविषयक घ्यावयाची जागरूकता आणि महिलांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या वतीने ‘सखी संवाद’ या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन शेठ. न. म. विद्यालय,खारेपाटण येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थिनी व माता-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रोटेरियन डॉ.अश्विनी नवरे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी शालेय विद्यार्थिनी तसेच माता-पालकांना स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच किशोरवयात मुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल,मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी, आरोग्यविषयक स्वच्छता, महिलांच्या विविध आरोग्यसमस्या आणि मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व याविषयी त्यांनी उपयुक्त माहिती दिली.स्त्रियांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणे, आरोग्यविषयक समस्यांबाबत मोकळेपणाने संवाद साधणे आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले. तसेच किशोरवयीन मुलींच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन व भावनिक आधार देण्याचे आवाहन माता-पालकांना करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे,महिलांच्या समस्यांबाबत योग्य माहिती पोहोचविणे आणि पालकांमध्ये संवेदनशीलता व समज वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. ‘सखी संवाद’च्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला.
तर महिलांच्या आरोग्या बाबत जागरूकता निर्माण करणारा आणि विद्यार्थिनी व पालकांना उपयुक्त माहिती देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला.











