खारेपाटण (प्रतिनिधी) : “व्यसन म्हणजे जिवंत मरण, त्यामुळे व्यसन सोडा आणि आपले जीवन सुधारा” असा संदेश देत सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर व अप्पर पोलिस अधीक्षक नयोनी साटम यांच्या आदेशान्वये खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस अंमलदार मिलिंद देसाई यांनी नुकताच खारेपाटण एस. टी. बस स्थानक येथे एका सामाजिक कार्यक्रमात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान उपक्रम राबविला.
खारेपाटण येथे युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवानिमित आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी प्रसिद्धी पत्रके उपस्थित नागरिकांना देण्यात आल्या. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये, संतोष पाटणकर, शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल, सूर्यकांत भालेकर, माजी सरपंच किशोर माळवदे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शेखर शिंदे, रामा पांचाळ, गणेश कारेकर, सचिन भालेकर यांसह खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी पराग मोहिते, अवधूत गुनिजन, उद्देश कदम आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. १३ ऑगस्ट, २०२५ ते १७ ऑगस्ट, २०२५ या कालावधी मध्ये अंमली पदार्थाचे धोके व दुष्परिणाम मोहीम राबविण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान घेण्यात येत असल्याचे खारेपाटण पोलिस दूर क्षेत्राचे पोलिस अंमलदार मिलिंद देसाई यांनी यावेळी सांगितले. तर या अभियानात आपण सर्वांनी सहभाग घेऊन आपला जिल्हा नाशमुक्त करूया असे आवाहन देखील त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.











