कोकणातील चांगले उमेदवार निवडून आणण्यासाठी सभासदही प्रयत्नशील
खारेपाटण (प्रतिनिधी) : कामगारांनी कामगारांच्या हितासाठी स्थापन केलेली आणि अमृत महोत्सवी वर्षाकडे घौडदौड करणारी मुंबई महानगर पालिकेच्या कामगार वर्गाशी संलग्न असलेली दि म्युनिसिपल को. ऑप. बँक लि. ची सन २०२५-३० या वर्षाकरीता ची पंचवार्षिक निवडणूक दि. २१ ऑगस्ट, २०२५ रोजी संपन्न होत असून या निवडणुकीत सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड जिह्यासह कोकणातील अनेक म्युनिसिपल कामगार बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीकरीता उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत. चांगले उमेदवार निवडून आणण्यासाठी आता सभासदही प्रयत्नशील झाले असल्याने कोकणच्या उमेदवारांचा झेंडा मुंबईच्या म्युनिसिपल बँकेत फडकतो का? हे निवडणुक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
यापूर्वी देखील दि. म्युनिसिपल को. ऑप. बँक संचालक मंडळावर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील म्युनिसिपल कर्मचारी बापुसाहेब साळीस्तेकर व हिम्मतराव कांबळे (साळीस्ते), मोतीराम साळुंके, विलास साळुंके (मुटाट), आर. के. वेंगसरकर (कुणकवण), नारायण कोंडकर (कोंडये), व्हि. डी. पवार (महाळुंगे), अशोक अडीवरेकर (राजापूर), श्री. शेवडे (कळसवली), तसेच शांताराम भांबेडकर (भांबेड), राया बापेरकर (बापेरे), जी. जी. जाधव, प्रकाश सोनू मोहिते, रत्नागिरी हे बँकेच्या डायरेक्टर बॉडीवर संचालक म्हणून निवडून गेले होते. अशा अनेक संचालकांचा गौरवशाली वारसा दि. म्युनिसिपल को. ऑप. बँकेला व या उमेदवारांना लाभला आहे.
आशिया खंडातील सहकारी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेच्या संचालक मंडळावर जाण्यासाठी अपक्ष व पॅनलच्या माध्यमातून १०९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, महापालिकेच्या २४ विभागातून ६०,१३८ बँक सभासद १९ संचालक निवडून देणार आहेत. निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असून गुलाबी मतपत्रिका महिला गट राखीव मतदार संघातून वैशाली रुपेश गिल व लीना उमेश इंगळे या उमेदवार निवडणूक रिंगणात उभ्या आहेत.
तर सफेद मतपत्रिका सर्वसाधारण गटातून रुपेश विठ्ठल पुरळकर, सचिन लक्ष्मण कदम, गौतम यशवंत कांबळे, दयानंद गणपत कांबळे, जगजीवन रामचंद्र कांबळे, सुभाष रामचंद्र कदम, महेंद्र आप्पा जाधव, विवेक विजय आठवले, निलेश पांडुरंग कांबळे, अनिल रामचंद्र मोहिते, संतोष गोविंद पवार, सुभाष मारुती अंकुश, मनेश अर्जुन पडेलकर,दिपक गोपाळ जाधव, निळी मतपत्रिका अ. जा./अ. ज. गटातून देवेंद्र यशवंत कांबळे, पिवळी मतपत्रिका इतर मागासवर्गीय प्रवर्गातून साईनाथ बाळकृष्ण घरत तर भ. वि. जाती/जमाती राखीव मतदार संघातून महादेव मल्हारी साळुंखे आदी उमेदवार या निवडणुकीत आपले नशिब आजमावताना दिसत आहेत.
कोकणातील मुंबई महानगर पालिकेत कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले तसेच म्युनिसिपल बँकेत सभासद असलेले अभ्यासू, निःस्वार्थी, पारदर्शक तसेच बँक आणि सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून प्रश्नांची, हिताची जाणीव असलेल्या प्रामाणिक, कृतिशील उमेदवारांना संचालक मंडळावर भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी बँकेचे सभासद ही प्रयत्नशील असल्याने बँकेची ही निवडणूक आता रंगतदार होणार यात शंका नाही.











