जागेच्या भांडणात फळविक्रेत्याला उचलून रस्त्यावर आपटले ; महिलेलाही मारहाण
अनधिकृत जागेत स्वतःची मालकी असल्याचा विक्रेत्यांचा आव
स्थानिक आणि परप्रांतीय वाद उफळण्याचीही शक्यता
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पटवर्धन चौकातील उड्डाणपुलाखालील भाजी विक्रेत्यांमध्ये जागेवरून झालेल्या वादात फळविक्रेत्याला भाजी विक्रेत्याने अक्षरशः उचलून रस्त्यावर आपटले. तर भाजीविक्रेत्या महिलेलाही फळविक्रेत्याकडून मारहाण झाली. मोरे आणि राठोड नामक विक्रेत्यांमध्ये हा मारामारी झाली. या वादाचे पडसाद उमटले असून नगराध्यक्षांनी उड्डाणपुलाखालील भाजी आणि फळ फुल विक्रेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान विरोधी गटनेता सुशांत नाईक यांनीही उड्डाणपूलखाली जात दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेतले. आज सकाळी जागेवरून दोन विक्रेत्यांमध्ये वाद उफाळून त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले. दोन्ही जखमीनी पोलीस ठाणे गाठले असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.












