नाट्यमय घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिताली सावंत यांचे भाजपला समर्थन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत सत्ताधारी ठाकरे सेनेला दिली सोडचिट्ठी
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण): अखेर देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये सत्तांतर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी सत्ताधारी ठाकरे सेना राष्ट्रवादी गटातून बाहेर पडत असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मिताली सावंत यांनी भाजपला समर्थन दिल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये भाजपाचे 8 आणि मिताली सावंत असे एकूण 9 तर शिवसेनेचे 7 असे बलाबल झाले आहे. या सर्व नाट्यमय घडामोडीचे सूत्रधार ठरलेले भाजपा आमदार नितेश राणे हे खऱ्या बाजीगर ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस च्या चिन्हावर विजयी झालेल्या एकमेव नगरसेविका असलेल्या मिताली सावंत यांनी शिवसेनेच्या 8 नगरसेवकांसोबत गट स्थापन केला होता. आता शिवसेनेचे रोहन खेडेकर हे नगरसेवक कायदेशीर अपात्र ठरल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये भाजपाचे 8 आणि सत्ताधारी सेना राष्ट्रवादी गटाचे 8 असे बलाबल होते. मात्र आता मिताली सावंत यांनी सेनेच्या गटाची साथ सोडत भाजपला समर्थन दिल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये भाजपाची सत्ता आली आहे.