“बाप्पाचा हा उत्सव मनामध्ये घर करतो | सातासमुद्रापार मानव भक्तीभावाने पुजतो.”– भजनबुवा सिद्धेश भोगटे

फोंडाघाट, मारुतीवाडी बालगोपाळ मंडळाची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे बहुरंगी आणि लक्षणीय !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे फोंडाघाट मारुतीवाडीच्या बालगोपाळ मित्रमंडळाची विसर्जन मिरवणूक पारंपरिक अन शिस्त पद्धतीने सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरली. सात्विक ड्रेसकोड मुळे बाहेरच्यांची घुसखोरी नव्हती. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, डीजेचा ढमढमाट यांना फाटा दिल्याने मिरवणुकीला भक्तीभावाची किनार होती. मिरवणूकी आधी नवोदित बुवा सिद्धेश भोगटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाडीतील बाप्पा विराजमान झाल्या घरी मोठ्या श्रद्धेने भजनांची तीन-चार अभंग-गौळणी घेऊन आरती केली. उत्तरपूजा सगळ्या घरी संपन्न झाल्यावर, बाप्पाच्या मूर्ती ट्रकमध्ये ठेवून परतीच्या प्रवासास निघाले…

यावेळी ढोल -ताशांच्या गजरात आणि ध्वनीक्षेपावरील भक्तीसंगीत आणि ओव्यामध्ये युवाई पासून अबालवृद्ध शिस्तीत आणि तालात पारंपारिक नृत्यात गुंग झाले होते. या मिरवणुकीमध्ये जुन्या जाणत्या महिला पुरुषांनी पारंपारिक पदांनी /ओव्यांनी लक्षवेधी रंग भरला. प्रत्येक जण बेधुंद होऊन बाप्पाची मिरवणूक आपल्या परीने सजवित होता. तर मंडळाचे काही कार्यकर्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यात आणि मिरवणूक शिस्तबद्ध राखण्यात सहकार्य करीत होते …

अखेर रात्री उशिरा मिरवणूक सवाद्य उगवाई नदीच्या घाटावर पोहोचली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आयोजित निर्माल्य संकलन या स्तुत्य उपक्रमांतर्गत,प्रत्येकाने आपण आणलेला फुलोरा त्यांच्या स्वाधीन करून पर्यावरण रक्षणासाठी मदत केली. पुन्हा एकदा उत्साहात भजनाची अभंग – पदे सुस्वरात आळवून भक्तीभावाने जोशपूर्ण,आवडीने बाप्पाची आरती करण्यात आली. शेवटच्या “घालीन लोटांगण –” या प्रार्थनेने सगळ्यांचे डोळे पाणावले. बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर याss सर्वांना सुखसमृद्धी द्याsss या गाऱ्हाणी घातल्यानंतर उगवाईपात्रात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.आणि प्रसाद वाटपानंतर सर्वजण गणेशोत्सवाची सांगता करून, जड पावलांने सर्वजण घरी परतले.. या मंडळाच्या लक्षवेधी विसर्जन मिरवणुकीची गावात चर्चा असून त्यांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!