यशश्री केंद्रशाळा मसुरे नं.१ ची इयत्ता सहावीची विद्यार्थीनी
चौके (प्रतिनिधी): केंद्रशाळा मसुरे नं.१ ची इयत्ता सहावी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी यशश्री गुरूनाथ ताम्हणकर हिने डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेमध्ये कोल्हापूर विभागातुन सुवर्ण पदक पटकावले. यशश्री ताम्हणकर हिला नुकतेच डॉ. सुधीर थत्ते, (वैज्ञानिक BARC), डॉ. नंदिनी देशमुख, (लेखिका) आणि बृहन्मुंबई सायन्स टीचर असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत एस.एन.डी.टी. काॅलेज, चर्चगेट मुंबई येथे सुवर्ण पदक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व आणि भविष्यातील वैज्ञानिक संधी या विषयावर इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी राज्यभरातून ही परीक्षा घेतली जाते. लेखी, प्रात्यक्षिक प्रकल्प व मुलाखत या चार टप्प्यांमधून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. अंतिम टप्प्यातील विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, रौप्यपदक व कांस्यपदक आणि प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येते. वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात त्यांना संधी दिली जाते. मसुरे नं.१ शाळेतील कु. यशश्री ताम्हणकर व कु. सानवी हिंदळेकर यांनी लेखी परीक्षेत यश मिळविले. कु. यशश्री हिने कोथरूड पुणे येथे झालेल्या प्रात्यक्षिक परीक्षेत आणि सायन मुंबई येथे झालेल्या प्रकल्प व मुलाखत परीक्षेत यश मिळवले. चालू वर्षीचा प्रकल्प विषय ‘वर्तमान पर्यावरण आणि नैतिकता’ हा होता. या परीक्षेसाठी रामेश्वरी मगर, युरेका सायन्स सेंटर कणकवलीच्या सुषमा केणी, तेजल ताम्हणकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ शर्वरी सावंत, शिक्षक विनोद सातार्डेकर, गोपाळ गावडे, गुरुनाथ ताम्हणकर, उमेश खराबी यांनी अभिनंदन केले.












