ई-पिक पाहणी ॲपमध्ये त्रुटी , प्रशासनाकडे लक्ष वेधण्याची शेतकऱ्यांची मागणी : असलदे रामेश्वर सोसायटी ६१ वी सर्वसाधारण सभा
कणकवली (प्रतिनिधी) : असलदे गावातील आंबा, काजु व विविध शेतकऱ्यांना संबंधीत विमा कंपनीकडुन पिकविम्याची रक्कम दसऱ्यापूर्वी जमा करण्यात यावी. तसेच पिक पाहणी नोंद करताना ई-पिक पाहणी अॅपमध्ये तांत्रिक त्रुटी येत आहेत. तसेच बागायतींच्या ठिकाणी नेटवर्क मिळत नसल्यामुळे पिक नोंदणी होत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जापासुन व पिकविम्यापासुन वंचित राहत आहेत. त्या त्रुटी महसुल विभागाने दुरुस्त कराव्यात, अशा मागण्या शेतकऱ्यांनी सभेत केल्या. त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधीत विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन चेअरमन भगवान लोके यांनी दिले.
असलदे येथील ग्रामपंचायतच्या रामेश्वर सभागृहात रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची ६१ वी सर्वसाधारण सभा चेअरमन भगवान लोके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला माजी चेअरमन प्रकाश परब, खरेदी विक्री संचालक पंढरी वायंगणकर, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे, राजेंद्र राणे, उदय परब, परशुराम परब, विठ्ठल खरात, प्रकाश खरात, शामराव परब, महेश लोके, रघुनाथ लोके, प्रशांत परब, प्रविण डगरे, बाबाजी शिंदे, दिनेश शिंदे, प्रकाश आचरेकर, वासुदेव दळवी, मधुसुदन परब, प्रकाश वाळके, सत्यवान घाडी, सोसायटी सचिव अजय गोसावी यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. या सभेत संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले.
भागधारकांना 10 टक्के लाभांश वाटप होणार –
चेअरमन भगवान लोके म्हणाले, संस्थेची उलाढाल ८२ लाख झाली आहे. विकास संस्थेमार्फत वाटप करण्यात आलेले कर्ज १०० टक्के वसुल झाल्याने तालुक्यातील ३७ संस्थांमध्ये आपली संस्था प्रथम क्रमांकाची ठरली आहे. संस्थेला ऑडीट वर्ग अ मिळाला असुन पारदर्शक कारभाराबाबत सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याची भुमिका आपल्या सोसायटीची आहे. संस्थेची उलाढाल गेल्या ४ वर्षात सातत्याने वाढत गेलेली आहे. चालु आर्थिक वर्षामध्ये १ लाख ७६ हजारांचा नफा झालेला आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांना शेअर्स गुंतवणुकीवर सरासरी १० टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. या पुढील काळातही संस्थेच्या प्रगतीसोबतच शेतकऱ्यांना हिताचे निर्णय घेतले जातील, असा विश्वास चेअरमन भगवान लोके यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांनी मांडले विविध ठराव
या सभेत चर्चेदरम्यान रामेश्वर सोसायटी कणकवली तालुक्यात 37 संस्थामध्ये एकमेव 100 टक्के वसुली पात्र ठरल्याने संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांनी पिकविमा दसऱ्यापुर्वी मिळावा त्यासाठी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा ठराव मांडला. ई-पिक पाहणी नोंदणी संदर्भात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्या अडचणींबाबत चर्चा करुन कणकवली तहसिलदारांना याबाबत तांत्रिक त्रुटी दुर करण्यासाठी लेखी कळवुन ई-पिक पाहणी नोंदणीसाठी विशेष मोहीम घेण्याची मागणी करण्यात यावी असे ठराव शेतकऱ्यांनी सभेत मांडले. यासह विविध मुद्द्यांवर चर्चा होवून सभा खेळीमेळीत पार पडली.












