वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात शनिवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. तसेच तालुक्यातील काही भागांत झालेल्या पावसामुळे पावसाअभावी अडचणीत आलेल्या नाचणी पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र कापणीला आलेल्या भात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वैभववाडी तालुक्यातील वातावरणात बदल जाणवू लागला होता. दिवसभर प्रखर उन्हाचा तडाखा जाणवत असतानाच आकाशात ढगांची गर्दी होत होती. उष्णता आणि ढगाळ वातावरण यांचा अनुभव नागरिकांना येत होता. शनिवारी दुपारनंतर आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह तालुक्यातील काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली.
ऑक्टोबर महिन्यात वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. दिवसभर जाणवणारा उन्हाचा कडाका आणि उकाड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. अशा परिस्थितीत सायंकाळी झालेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळाला.भात आणि नाचणी ही तालुक्यातील प्रमुख पिके असून, भात शेती आदीच पावसाने ओढ दिल्याने करपून गेली आहे. तर उरले सुरले भात शेतीचे या पावसाने नुकसान झाले आहे.












