सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष राजेश पडवळ यांचा गौरव; रक्तदान चळवळीत मोलाचे योगदान

वैभववाडी (प्रतिनिधी) : रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या विचारातून समाजसेवेचा वसा घेत रक्तदान चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे वैभववाडी तालुकाध्यक्ष राजेश पडवळ यांना जीवन धारा ब्लड बँकेच्यावतीने ‘रक्तदूत गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. दुर्गामाता उत्सव मंडळ, वैभववाडी आयोजित रक्तदान शिबिरात त्यांनी आपले ३२ वे रक्तदान पूर्ण केले. या दुहेरी आनंदाच्या क्षणामुळे त्यांच्या रक्तदान सेवेतील योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण वैभववाडी तालुक्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, रक्तदानाची चळवळ अधिक व्यापक करणे तसेच महाराष्ट्रातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नयनिश मोरे , कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून देण्यात आलेला हा पुरस्कार सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष संजय शिवाजी रावराणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे रक्तदान चळवळीत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.
हा पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून, प्रतिष्ठानचे प्रशांत गुळेकर , जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडुलकर ,अमय मडव तसेच सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानच्या संपूर्ण तालुका टीमच्या अथक परिश्रमाचे आणि सहकार्याचे फलित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना समर्पित केला.
रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा आणि या सामाजिक चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शांताराम रावराणे,डॉ. राजेंद्र पाताडे, संजय रावराणे, श्री घाडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!