कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 अंतर्गत दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहीम राबविण्यात येत आहे. आज दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी एक दिवस-एक तास-एक सोबत या संकल्पनेतून देशव्यापी श्रमदान आयोजित करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये या स्वच्छता श्रमदानाचे आयोजन करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेमध्ये लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, युवक मंडळे, विद्यार्थी, संस्था, शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय विद्यार्थी सेना, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, ग्रामपंचायत कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते. गावातील स्वच्छतेसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांची स्वच्छता करण्याची मोहिम 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरु राहणार आहे.
जिल्ह्यात आज एक दिवस, एक तास, एक साथ या घोषवाक्याखाली स्वच्छता महाश्रमदानाला सुरुवात झाली. गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, ग्रामपंचायत परिसर, आरोग्य केंद्र परिसर, ऐतिहासिक ठिकाणे तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. ग्रामपंचायत शिरोली, तालुका हातकणंगले येथे आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थित महाश्रमदान मोहिम राबविण्यात आली. यावेळी गावातील मंदीर परिसर, तलाव परिसर व स्मशानभुमी या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. तसेच गावात दर 15 दिवसांनी ही स्वच्छता मोहीम राबविणे आणि गाव प्लास्टीक कचरा मुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
तालुका स्तरावर श्रमदानासाठी निवडलेल्या गावांमध्ये तालुका गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी व पंचायत समिती कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामस्थ यांनी या मोहिमेत सहभागी होवून, स्वच्छतेसाठी श्रमदान केले. यामध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक ठिकाणांचीही स्वच्छता यावेळी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शाहुवाडी तालुक्यातील ऐतिहासिक स्थळ पावनखिंड (गजापुर), हातकणंगले तालुक्यातील लंडन हाऊस, शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या श्रमदान मोहिमे सोबतच विविध उपक्रम यावेळी राबविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने श्रमदानासाठी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली, नवीन बांधकाम करण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन, सफाई मित्र कर्मचारी यांचा सत्कार तसेच प्लास्टीक बंदी बाबत जनजागृती करण्यात आली. तसेच कच-याचे ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.












