कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके 1947 च्या तृतीया वृद्धी तिथीला नवरात्र महोत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई मातंगी रूपात सजली आहे . दशमहाविद्यापैकी मातंगी ही संगीत देव विद्येची देवता म्हणून प्रसिद्ध आहे ज्या वेळेला भंडासूरदैत्याचा संहार करण्यासाठी सर्व देवांच्या आवाहनानुसार भगवती ललिता प्रगट झाली त्यावेळेला विषङ नावाच्या दैत्याला मारण्यासाठी राजश्यामला अर्थात मैत्रिणी देवीचा अवतार झाला.
पुढे हिमालयाने आपल्या घरी आदिशक्तीने कन्या रूपात अवतार घ्यावा म्हणून जगदंबेची उपासना केली त्यावेळेला भगवती ललिता पार्वती रूपाने हिमालयाच्या घरी अवतीर्ण झाले. हिमालयाचा मित्र असणाऱ्या मातंग मुनींनी ललितेची प्रिय सखी असणाऱ्या राजशामलेची उपासना याच कारणासाठी केल्यानंतर भगवती राजश्यामला त्यांची कन्या रूपात प्रगट झाली मातंग ऋषींची कन्या म्हणून ती मातंगी. हे मातंगी संगीत विद्येची देवता मानली जाते तिच्या उपासकात संगीतविद्येला तसेच ती विद्या असणाऱ्या गायक वादकांना प्रचंड सन्मान दिला जातो कारण वाद्यांचा किंवा संगीताचा अपमान हा मातंगीचा अपमान मानला जातो. मातंगी याच रूपान भगवती पराशक्तीच्या प्रत्येक अवताराच्या वेळेला अवतार धारण करत असते रेणुका अवतारात मातंगीचे मस्तक जळवूनच रेणुका पुनर्जीवित करण्यात आली. भवानीच्या अवतारात देखील मतंग नावाच्या दैत्याच्या संहारासाठी देवी मातंगी स्वतः युद्ध करायला आली असा उल्लेख तुरजा महात्म्य ग्रंथात आहे. श्री मातंगीची अनेक आयुध वर्णन उपलब्ध असली तरी आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई हातामध्ये ढाल अंकुश चंद्रहास खड्ग आणि पाश धारण केलेल्या रूपामध्ये सव्य ललिता सणात विराजमान आहे.













