१०७ लाभार्थ्यांनी घेतला लाभ
खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय डाक विभाग सिंधुदुर्ग व ग्रामपंचायत पोंभुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी येथील ग्रामपंचायत कार्यालयात नुकताच दोन दिवसीय आधार कॅम्प पोंभुर्ले सरपंच प्रियंका धावडे व डाकघर सिंधुदुर्ग अधीक्षक एस. टी. कुरळपकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. यावेळी उपसरपंच सादिक डोंगरकर, पोलिस पाटील राखी मोंडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष किशोर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य उदय बावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डाक भाग विभाग मार्फत जिल्हातील नागरिकांना आपले आधार कार्ड अपडेट करून घेण्यासाठी तसेच बँकिंग व इतर प्रशासकीय सवलती सुलभ होण्याच्या दृष्टीने आधार कॅम्प लावण्याचे आवाहन स्थानिक ग्रामपंचायत यांना करण्यात आले होते. पोंभुर्ले सरपंच प्रियांका धावडे यांनी जिल्ह्यातून पहिला फोन सिंधुदुर्ग डाक विभाग अधीक्षक एस. टी. कुरळपकर यांनी करून दिनांक २६ व २७ सप्टेंबर रोजी हा कॅम्प ग्रामपंचायत पोंभुर्ले येथे घेण्याचे सुचविण्यात आले होते. सदर आधार कॅम्पमध्ये शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी सहभाग घेत सुमारे १०७ लाभार्थी नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. या कॅम्पवेळी डाकघर सिंधुदुर्ग अधिक्षक एस. टी. कुरळपकर यांनी नागरिकांना आधार कार्डचे महत्त्व नागरिकांना पटवून त्याबाबतची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाला उपस्थित डाक अधीक्षक श्री. कुरळपकर यांचा सरपंच प्रियांका धावडे यांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन पोंभुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी डाक विभाग जिल्हा अधीक्षक एस. टी. कुरळपकर व त्यांचे सहकारी यांचे उपसरपंच सादिक डोंगरकर यांनी आभार मानले व जिल्ह्यात आधार कॅम्प लावण्याचा पहिला मान मिळाला आणि त्याचा लाभ येथील नागरिकांना मिळाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.












