जागृत उन्नती मंडळ त्रिंबक, मुंबईचे कार्यकर्ता निवासी चिंतन शिबीर संपन्न

गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवण्याचा दृढनिश्चय

आचरा (प्रतिनिधी) : जागृत उन्नती मंडळ त्रिंबक, मुंबई या संस्थेच्यावतीने २७, २८ सप्टेंबर २०२५ रोजी सिमर रिसॉर्ट, भाईंदर मुंबई या ठिकाणी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात जागृत उन्नती मंडळाच्या १३ शिबिरार्थीनी सहभाग घेतला. हे शिबीर दोन सत्रात संपन्न झाले. पहिल्या सत्राचा विषय कार्यकर्ता कसा असावा, संघटन कौशल्य, प्रबोधन या विषयी संस्थेचे अध्यक्ष दत्ता पवार यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व शिबिरार्थिंनी खुल्या चर्चेअंतर्गत मनोगते व्यक्त केले. यासत्राचे सूत्रसंचालन अरविंद कदम आणि आभार प्रदर्शन मंगेश शेटे यांनी केले.

रविवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी सर्व शिबिरार्थिंनी ध्यानधारणा आणि विपश्यना आदी कार्यक्रम झाल्यावर व्यक्ती आणि सामाजिक बांधिलकी या विषयावर योगेश साटम यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे दुसरे सत्र कार्याध्यक्ष चेतन साटम यांच्या मार्गदर्शना खाली सुरू झाले. या सत्रात गावातील पाण्याची पातळी वाढविणे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, प्लास्टिक व्यवस्थापन, आरोग्यसुविधा, ग्रामस्थांसाठी व्यसनमुक्ती व सामाजिक प्रबोधन शिबिरे, महिला सबलीकरण या विषयांवर चर्चा झाली. तसेच संस्थेसाठी आर्थिक नियोजन या विषयावर संतोष त्रिंबककर यांनी मार्गदर्शन केले.

या शिबिरात त्रिंबक गावातील विहिरी, जलसाठे यांच्या पाण्याची पातळी वाढवण्यासाठी ओढण्याची खोदाई करणे, नजीकच्या काळात आपला गाव, हरीत व्हावा यासाठी प्रत्येक वर्षी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करणे, गावातील लोकांचे आरोग्य सुदृढ होण्यासाठी मे महिन्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करावे. सामाजिक कार्य करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करण्यासाठी निधिसंकलन कार्यक्रमांचे आयोजन करावे. मंडळाने महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी ग्रामीण पातळीवर जनजागृती अभियान राबवावे, मे महिन्यात व्यसनमुक्ती आणि सामाजिक बांधिलकी या विषयांवर मार्गदर्शक शिबिरांचे आयोजन करणे, हे ठराव घेण्यात आले.

या शिबिरात दत्ता पवार, चेतन साटम, अरविंद कदम, संतोष त्रिंबककर, अनिल कदम, नवनीत घाडीगांवकर, दिपा केरकर, प्रियांका मटकर, योगेश साटम, मंगेश शेटे, सुनील जाधव, तुषार चिंदरकर, विश्वंभर राऊत हे शिबिरार्थी सहभागी झाले होते. दत्ता पवार यांच्या संकल्पनेतील जागृत उन्नती मंडळ त्रिंबक या संस्थेचे पहिले चिंतन शिबीर संपन्न झाले. या शिबिराचे सूत्रसंचालन दत्ता पवार आणि आभार प्रदर्शन प्रियंका मटकर यांनी केले.

error: Content is protected !!