के. के. घाटवळ यांची ‘माय भारत’ राज्य संचालकपदी नियुक्ती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या ‘माय भारत’ (MY Bharat) या कार्यालयात राज्य संचालकपदी के. के. (कालिदास कांता) घाटवळ यांची नियुक्ती झाली असून त्यांनी नुकताच मुंबई येथे पदभार स्वीकारला आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या या राष्ट्रीय संस्थेला त्यांच्या अनुभवाचा लाभ होणार आहे.

गोव्याच्या शिरगाव-अस्नोडा गावचे सुपुत्र असलेले घाटवळ यांनी १९९४ मध्ये नेहरू युवा केंद्र, मडगाव येथे जिल्हा युवा समन्वयक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. लातूर जिल्ह्यात कार्यरत असताना किल्लारी भूकंपादरम्यान मदतकार्यात त्यांनी मोठा सहभाग नोंदवला.

सन २००० मध्ये सिंधुदुर्गात बदली झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युवा संमेलन, भुज भूकंप मदतकार्य, ४५० हून अधिक वनराई बंधारे, सिंधू जल मेळावा, जनजागृती मोहिमा अशा उपक्रमांद्वारे युवकांना सक्रिय केले. त्यांच्या नेतृत्वाखाली घडलेले अनेक कार्यकर्ते आज राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.

सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी तसेच गोव्यातील मडगाव व पणजी येथेही त्यांनी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून प्रभावी काम केले. सध्या ते सिंधुदुर्गचे उपसंचालक (जिल्हा युवा समन्वयक) असून आता राज्य संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. युवकांचे संघटन, राष्ट्रीय ऐक्य व जलसंधारण क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय असून त्यांचे नेतृत्व भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

error: Content is protected !!