ओसरगाव सरपंच सुप्रिया कदम यांचा मराठवाडा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

सरपंचपदाचे मानधन सी. एम. रिलीफ फंडात केले जमा

कणकवली (प्रतिनिधी) : मराठवाडा भागातील भयावह पूरस्थिती आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन सिंधुदुर्गवासीयांना केले होते. त्यानुसार कणकवली तालुक्यातील ओसरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सुप्रिया संतोष कदम यांनी सरपंचपदाचे आपले एका महिन्याचे मानधन चार हजार रुपये सी. एम. रिलीफ फंडात जमा केले आहे. मराठवाडा भागातील शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. राहती घरे वाहून गेली आहेत. हजारो कुटुंब बेघर झाली आहेत. या संकटकाळी आपण महाराष्ट्रीय आहोत त्यामुळे मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करणे आपले कर्तव्य आहे, या भावनेतून सरपंच पदाचे मानधन सीएम रिलीफ फंडाला जमा केल्याचे सरपंच सुप्रिया कदम म्हणाल्या. या संकटकाळी आपल्या परीने ज्यांना ज्यांना शक्य होईल तसा मदतीचा हात पुढे करणे आवश्यक असल्याचेही कदम म्हणाल्या.

error: Content is protected !!