सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वडिलोपार्जित घर नावावर करताना नागवे ग्रामपंचायतीने कोणतीही चौकशी अथवा खातर जमा न करता एकाच व्यक्तीच्या नावे करून इतर सहहिस्सेदारांवर अन्याय केला आहे. सदर प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. या मागणीसाठी नागवे येथील प्रीतम जयप्रकाश मोरे यांनी जिल्हा परिषदेसमोर आज पासून आमरण उपोजन सुरू केले आहे.

कणकवली तालुक्यातील नागवे ग्रामपंचायत हद्दीत मोर्ये कुटुंबीयांचे वडिलोपार्जित घर आहे सदर मालमत्ता ही वडिलोपार्जित असतानाही नागवे ग्रामपंचायत कडून मिळालेल्या माहितीनुसार हे घर गजानन नारायण मोर्ये यांच्या नावे करण्यात आले आहे. मात्र हे घर १९५९ ते १९७८पर्यंत त्यांचे वडील गंगाराम अनंत मोर्ये यांच्या नावे होते. त्यांच्या मृत्यु नंतर सदर मालमत्ता सन १९८४ सालात त्यांचा मोठा मुलगा नारायण गंगाराम मोर्ये यांनी त्यांच्या दोन भावांची संमती न घेता आपल्या नावे करून घेतली. त्यांच्या दोन भावापैकी विश्वनाथ गंगाराम मोर्ये यांचा मृत्यु झाला होता. पण जयप्रकाश गंगाराम मोर्ये हे हयात होते. दिनांक ३१ ऑक्टोबर २००२ रोजी नारायण गंगाराम मोरे यांचा मृत्यू झाला व त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा मुलगा गजानन नारायण मोर्ये यांनी १४ फेब्रुवारी २०११ रोजी ग्रामपंचायत (नागवे) कडे घर आपल्या नावे करण्याकरिता अर्ज केला होता, सदर अर्जा सोबत लक्ष्मी नारायण मोर्ये व सुनील नारायण मोर्ये, अनिल नारायण मोर्ये यांनी दिलेली संमतीपत्र तसेच त्यांच्या वडिलांचा मृत्यू दाखला जोडून प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे दिला होता.
परंतु सदर मालमत्ता वडिलोपार्जित असल्याने ग्रामपंचायती ने संबंधित प्रस्ताव फेटाळला होता. पुन्हा ८ ऑक्टोबर २०१८ रोजी गजानन नारायण मोर्ये यांनी तोच प्रस्ताव ग्रामपंचायतकडे सादर केला. त्याही प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. त्यानंतर तब्बल सात वर्षानंतर १२ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रामपंचायत मासिक सभेत सदर ठराव मांडण्यात आला त्यावेळी तो सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. मात्र यावेळी ग्रामसेवक यांनी काही टिपण्या केल्या होत्या पण सदस्यांचे संख्याबळ असल्याने ठराव मंजूर झाला. असे असले तरी ग्रामपंचायतीने १४ वर्षे प्रलंबित प्रस्तावाला कोणत्या निकषात मंजूर केला, याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच १४ वर्षांपूर्वी नोटरी केलेले संमती पत्र ग्राह्य कसे धरले गेले, तसेच २०११ ला केलेला अर्ज अजून पर्यंत कसा ग्राह्य धरण्यात आला. ही संशय व्यक्त करण्यासाठी गोष्ट आहे. तरी याबाबत योग्य ती चौकशी करून संबंधित दोषीवर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी प्रीतम मोर्ये यांची असून यासाठी त्यांनी आज पासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निवेदना द्वारे लक्ष वेधले आहे.












