सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील बुटफेक घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा बार असोशिएशनकडून निषेध

न्यायालयाचा व पक्षकारांचा खोळंबा होऊ नये यासाठी लालफिती लावून कामकाज

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कामकाजाच्या वेळी वकिलाकडून बुट फेकण्याच्या झालेल्या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा बार असोशिएशनच्या वतीने आज निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच न्यायालयाचा व पक्षकारांचा खोळंबा होऊ नये यासाठी लालफिती लावून कामकाज करण्यात आले.

६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली एका याचिकेवर सुनावणी सुरू असताना एका वकिलाकडून त्यांच्या दिशेने बुट फेकण्याचा प्रयत्न केला. याप्रकाराबाबत सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा बार असोशिएशनने देखील जिल्हा न्यायालय परिसरात एकत्र येत या घटनेचा निषेध केला. यावेळी महाराष्ट्र बार असोशिएशनचे सदस्य ॲड. संग्राम देसाई, जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, ॲड. बंड्या मांडकुलकर, ॲड. यतीश खानोलकर, ॲड. शाम सावंत, ॲड. गौरी देसाई, राजेश परुळेकर यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते. या घटनेचा निषेध करताना न्यायालयाच्या कामकाजाचा आणि पक्षकारांचा खोळंबा होऊ नये यासाठी लालफिती लावून आज कामकाज करण्यात आले असल्याचे ॲड. संग्राम देसाई यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!