सिंधुदुर्गात मराठा आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी – मराठा सेवा संघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मराठा समाजाला इतर मागासवर्ग कोट्यातून आरक्षण देण्याबाबत झालेल्या शासन निर्णयाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात तात्काळ अंमलबजावणी करावी. अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केले आहे. अखिल भारतीय मराठा सेवा संघ सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे याची भेट घेत निवेदन सादर केले, या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाच्या मागणीनुसार मराठा समाजाला इतर मागास प्रवर्ग कोट्यातून आरक्षण देण्याबाबतचा शासन निर्णय अलीकडेच निर्गमित झाला असून त्याची अंमलबजावणी म्हणून जिल्हा पातळीवर हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट इत्यादी मधील नोंदीवरून मराठा समाजाला दाखले देणे सुरू झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा नोंदी आहेत. वर्तमानपत्रातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा पद्धतीच्या एक लाख पर्यंत नोंदी आढळल्याच्या बातम्या काही काळापूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानुसार दाखले प्रदान केल्याचे दिसून येत नाही. तरी मराठा समाज संघटनांच्या वतीने याकडे लक्ष वेधण्यात येत आहेत.तरी याबाबत तात्काळ दखल घेऊन मराठा समाजाला कुणबी मराठा, मराठा कुणबी असे दाखले नोंदीनुसार प्रदान करणे बाबतचे आदेश सर्व तहसीलदार यांना देऊन तात्काळ कार्यवाही सुरू करावी. तसेच आपल्याकडून होत असलेल्या कार्यवाहीची वर्तमानपत्र वा अन्य माध्यमातून प्रसिद्धी द्यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली . यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे एस. एल. सपकाळ, एस. टी. सावंत, लक्ष्मण पावसकर, अविनाश राणे, गजानन राणे, लवू गावडे, विश्वनाथ राऊळ, श्रीधर वारंग, श्रीधर गावडे, बाबुराव वारंग व इतर बहुसंख्य मराठी बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!