देवगड (प्रतिनिधी) : यावर्षी देवगड तालुक्यातील बहुतेक भागात आंबा व काजू फळबागांना पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देवगड तालुका कृषी आत्मा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष महेश सहादराम पाटोळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून ७/१२ वर पोटखराब क्षेत्र कमी करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, देवगड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबा व काजू फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, झाडांना बुरशीजन्य आजार व फुलकळी नष्ट होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाने पिकविमा आणि अन्य मदतीसाठी पोटखराब क्षेत्र कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, ३० नोव्हेंबर २०२५ ही पिक विमा उतरवणीची अंतिम तारीख असल्याने प्रशासनाने तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा, असेही पाटोळे यांनी निवेदनात नमूद केले आहे. नुकसानग्रस्त आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने त्वरीत मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.












