खारेपाटण गुरववाडी येथे घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार

सुभाष गायकवाड व समीर गायकवाड यांच्या घरांना चोरांनी केले लक्ष

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गुरववाडी येथील रवळनाथ मंदिर जवळील सुभाष उर्फ पिंट्या हनुमंत गायकवाड व समीर सुरेश गायकवाड यांच्या बंद घराची अज्ञान चोरट्यांकडून घरफोडी करून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळवून नेल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री १२ च्या दरम्यान हि घटना घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

चोरट्यांनी चोरलेल्या ऐवजमध्ये पिंट्या गायकवाड यांच्या मुलीच्या कानातील सोन्याचे झुमके, पत्नीच्या कानातील सोन्याच्या रिंग व आईच्या कानातील सोन्याच्या कुड्या तसेच घरातील लोखंडी कपाटाच्या लॉकर मधील आईचे व पिंट्या यांचे सुमारे ७०,०००/- रुपये चोरीस गेले. तर त्यांचा चुलत भाऊ समीर गायकवाड यांच्या घरातून त्यांच्या मुलीची ५ ग्राम सोन्याची चैन व कपाटातील लॉकर मधील १ लाख ५८ हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण गुरववाडी येथील रहिवासी असलेले चायनीज व्यावसायिक पिंट्या गायकवाड व मटण व्यावसायिक समीर गायकवाड हे आपल्या कुटुंबातील चुलत भावाच्या लग्न सोहळ्याकरिता आपले खारेपाटण येथील घर बंद करून संपूर्ण कुटुंबासह कोल्हापूर येथे सोमवारी सकाळी निघून गेले होते. दरम्यान कोल्हापूर येथून बुधवारी सकाळी १० वाजता खारेपाटण येथे घरी आल्यानंतर दोन्ही भावांच्या घराचे पुढचे दार कुलुप तोडल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यांनी घरात जाऊन बघितले असता घरातील बंद कपाटे फोडून त्यातील सोन्याचे दागिने व रक्कम चोरट्यांनी पळवल्याचे निदर्शनास आले.

चोरट्यांनी आपल्या घराची घरफोडी केली ही बाब लक्षात येताच दोन्ही गायकवाड बंधूंनी खारेपाटण पोलिस स्टेशन येथे आपली फिर्याद नोंदवली. घटनेची माहिती मिळताच खारेपाटण पोलिस स्टेशनचे हवालदार पराग मोहिते व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी यांनी खारेपाटण गुरववाडी येथील श्री. गायकवाड यांच्या घराची पाहणी केली. यामध्ये घरचा मुख्य दरवाज्याचा कडी कोयंडा तोडल्याचे व लोखंडी कपाट फोडल्याचे निदर्शनास आले. यावेळी सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान सायंकाळी उशिरा खारेपाटण येथे कणकवली पोलिस स्टेशन येथून चोरीचा तपास करण्यासाठी श्वान पथक पाठवण्यात आले होते. या घटनेचा अधिक तपास खारेपाटण पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी व कणकवली पोलीस स्टेशनचे पोलिस अधिकारी करत आहेत.

error: Content is protected !!