आंगणेवाडी भराडी देवी यात्रोत्सव ९ फेब्रुवारीला

मालवण (प्रतिनिधी) : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. आज सकाळी आंगणे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने देवीला कौल लावून यात्रेची तारीख निश्चित केली.

दरवर्षी यात्रेच्या तारखेकडे भाविकांचे विशेष लक्ष लागलेले असते. निश्चित तारीख नसल्याने परंपरेनुसार कौल लावूनच यात्रा जाहीर केली जाते. आज ठरलेली तारीख जाहीर होताच ही वार्ता क्षणार्धात सर्वदूर पोहोचली आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. यात्रा तारीख निश्चित झाल्याने भाविकांनी सुट्ट्यांचे आणि प्रवासाचे नियोजन सुरू केले असून रेल्वे व बस बुकिंगलाही वेग आला आहे.

यात्रेच्या तयारीत म्हणून ३ ते ५ डिसेंबर २०२५ दरम्यान श्री देवी भराडी मंदिर धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे. या काळात मंदिरात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती आंगणे कुटुंबीयांनी दिली असून भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!