फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील अर्थशास्त्र विभाग यांच्या वतीने मुंबई बाहेरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित 59वी ए.डी. श्रॉफ स्मृती वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट ए.डी. श्रॉफ यांच्या स्मृतीस अभिवादन करून अर्थशास्त्र व संबंधित समकालीन आर्थिक-सामाजिक विषयांवरील विद्यार्थ्यांच्या विचारमंथनाला चालना देणे व त्यांच्या वक्तृत्व कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे होते. स्पर्धेच्या सुरुवातीस अर्थशास्त्र विभागप्रमुख तसेच स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी स्पर्धेची पार्श्वभूमी, उद्देश, मूल्यमापन पद्धत, वेळेचे नियम तसेच विषयांचे राष्ट्रीय स्तरावरील औद्योगिक व बाजारपेठीय महत्त्व विद्यार्थ्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन करून सहभागी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला.
स्पर्धेसाठी पुढील तीन विषय देण्यात आले होते 1. भारताला जागतिक उत्पादन केंद्र (Manufacturing Hub) बनवणे, 2. Job Creators विरुद्ध Job Seekers – काळाची गरज कोणती?, 3. शिक्षण व कौशल्ये कॉर्पोरेट/उद्योग मागणीशी सुसंगत आहेत का? या विषयांवर विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिंदी व मराठीसह प्रादेशिक भाषेत ५ मिनिटांच्या कालमर्यादेत प्रभावीपणे मतप्रदर्शन केले.स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक : नीता दिलीप धुरी (₹ २,५००/- व प्रमाणपत्र) द्वितीय क्रमांक : कोमल चंद्रकांत जाईल (₹ १,५००/- व प्रमाणपत्र), तृतीय क्रमांक : चेतन महादेव डोंगरे (₹ १,०००/- व प्रमाणपत्र) उत्तेजनार्थ पारितोषिक (प्रमाणपत्र) : श्रुती दीपक धवन आणि प्रियंका प्रसाद मोंडकर.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देताना सांगितले की, अशा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेसह व्यावसायिक भविष्याला बळकटी देतात.” त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. सतीश कामत, प्रा. विनोदसिंह पाटील आणि प्रा. रुपाली पाटील यांनी काम पाहिले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक – शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.












