न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची जनजागृती मोहीम

मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांचे पालकांना आवाहन

ओरोस (प्रतिनिधी) : बालकांमधील न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या न्युमोनिया जनजागृती व प्रचार प्रसिद्धी (सांन्स कॅम्पेग्न) या विशेष मोहीमेत बालकांच्या पालकांनी सक्रिय सहभाग घेऊन न्यूमोनियाच्या लक्षणांकडे लक्ष द्यावे आणि आपल्या बालकास न्युमोनियाची लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य संस्थेकडे घेऊन जावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.

या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा टास्कफोर्सची मीटिंग मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश करतसकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी निलेश मटकर, सांख्यिकी अधिकारी निकेत जाधव, डीपीएचएन विक्रम पवार व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

​या मोहिमेचे मुख्य ध्येय २०२५ पर्यंत बालकांमधील न्यूमोनियामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण दर हजारी जिवंत बालकांमागे ३ पेक्षा कमी करणे, हे आहे. प्रमुख उद्दिष्ट्य बालकांमधील न्यूमोनियाचा प्रतिबंध आणि बचावासाठीच्या उपाययोजनांबाबत सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे. पाच वर्षांखालील बालकांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे त्वरित ओळखणे आणि तातडीने उपचार सुरू करणे. तीव्र न्यूमोनियाच्या रुग्णांसाठी उपचाराकरिता आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण करणे, ही आहेत.

आशा कार्यकर्त्या पाच वर्षांखालील बालकांच्या गृहभेटीदरम्यान न्यूमोनियाच्या लक्षणांचे स्क्रीनिंग करणार आहेत. ​जोखमीच्या बालकांचा शोध घेऊन पुढील उपचारांसाठी वैद्यकीय अधिकारी किंवा आरोग्य सेविकांकडे संदर्भित करणार आहेत. संदर्भित करण्यापूर्वी आशा अमोक्सीसिलिन सिरपची पहिली मात्रा देतील. न्यूमोनियाचे प्रमाण कमी करण्यासाठी न्युमोकोकल संयुगिक लस या लसीचा अधिकाधिक बालकांना लाभ मिळेल याची खात्री करणार आहेत, अशा प्रकारे उपाययोजना करणार आहेत.

यासाठी आरोग्य संस्था स्तरावर ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स ठरवून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभागात प्रदर्शित केले जातील. आवश्यक औषधे, उपकरणे आणि ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल. ​अतिगंभीर बालकांना तातडीने उपचार देण्यासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये ‘ट्रायएज एरिया’ तयार केला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

error: Content is protected !!