कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणूकीच्या 21 डिसेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष लागून राहिले आहे. कणकवली नगरपंचायत निवडणूकीत 2 डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासूनच एका प्रभागातील उमेदवाराने आपल्या प्रभागातील मतदारांचा पिच्छाच पुरवायला सुरुवात केली. मतदारांना गाठून तुम्ही मलाच मतदान केलात ना? अशी प्रश्नावली विचारतानाच तो उमेदवार मतदारांना शपथाही घेण्याचा आग्रह करू लागल्याच्या चर्चा आहेत. तुम्ही मला मतदान केले म्हणता पण तुमच्या मुलाने मलाच मतदान केले ना? अशी उलट चौकशीसुद्धा त्या उमेदवाराकडून होत असल्यामुळे त्या प्रभागातील मतदार कंटाळून गेले आहेत.
मुळात निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने झाली असल्यामुळे नेमकं कोणी कोणाला मतदान केलं, हे काहीही झाले तरी समजू शकत नाही. कणकवली नगरपंचायत निवडणूकीत दोन्ही बाजूच्या उमेदवारांकडून मतदारांना चांगलेच लक्ष्मी दर्शन झाले हे उघड गुपित आहे. असे असले तरी मतदारांना दोन्ही बाजूने लक्ष्मी दर्शन घडले असल्यामुळे उमेदवार सुद्धा संभ्रमित अवस्थेत आहेत. अशात त्या उमेदवाराचा आणखीन गोंधळ उडाला असून खरेच मतदारांनी आपल्यालाच मतदान केलेय का, याची पडताळणी शपथा घ्यायला लावून आणि प्रश्नांच्या माध्यमातून केली जात आहे. मतदार मात्र त्या उमेदवाराच्या टवाळकीला कंटाळले असून कधी एकदा 21 डिसेंबर तारीख येतेय, निवडणूक निकाल लागतोय आणि त्या उमेदवाराला मतपेटीतून उत्तर मिळतेय, याचीच वाट मतदार बघत आहेत.












