“तरुण पिढीला कमकुवत करण्यासाठी परकीय शक्तींचे षडयंत्र”…अॅड. राजीव बिले, जेष्ठ कायदे तज्ञ
खारेपाटण (प्रतिनिधी) : “तरुणांमध्ये दारू सह अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. आजच्या तरुण पिढीला कमकुवत करण्यासाठी परकीय शक्तीकडून षडयंत्र रचले जात आहे यासाठी पालकांनी आणि समाजाने सजग राहून त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी काम केले पाहिजे. असे प्रतिपादन जेष्ठ कायदे तज्ञ अँड. राजीव बिले यांनी दारूचे दुष्परिणाम जनजागृती समितीच्या वर्षपूर्ती कार्य अहवालाक्या प्रकाशन सोहळ्यात मार्गदर्शन करताना काढले. कोकणरत्न ॲड. राजीव बिले यांच्या अध्यक्षतेखाली अणाव येथील रामेश्वर मंदिर, येथे संपन्न झालेल्या संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपेश धुरी हे उपस्थित होते. तर अणावचे सरपंच लिलाधर अणावकर, पोलिस पाटील सुनिल पाटकर, ग्रामसेवक प्रदीप नारकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष विनायक अणावकर, यांच्या समाजसेवक दिवाकर परब, प्रा. कानशिडे, समितीचे अध्यक्ष श्री संदिप परब,सचिव उमेश पटवर्धन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अणाव गावातील दारूबंदी जनजागृती समितीचे अध्यक्ष व संविता आश्रमचे संस्थापक संदिप परब यांनी सभेचा उद्देश स्पष्ट करून उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त अधिकारी बाळकृष्ण परब यांनी केले. पोलीस पाटील सुनिल पाटकर यांनी दारूबंदी जनजागृती संघटनेची सुरुवात अणाव गावातून होते ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले. डॉ. रुपेश धुरी यांनी दारूबंदी संदर्भात अभिनव व विचारप्रवर्तक कल्पना मांडत सुचविले की, “दारू खरेदी करताना स्कॅनरद्वारे होणाऱ्या पेमेंटसाठी घरातील जबाबदार व्यक्तीच्या मोबाईलवर ओटीपी जावा व त्या व्यक्तीची संमती मिळाल्यानंतरच व्यवहार पूर्ण व्हावा. उदाहरणार्थ, वडील किंवा पत्नी यांची संमती मिळाल्यावरच संबंधित व्यक्तीस दारू मिळावी. असे झाल्यास दारूबंदी मोहिमेत कुटुंबाचा सहभाग वाढेल व दारूबंदीच्या दिशेने हे एक प्रभावी पाऊल ठरेल, असे त्यांनी मत व्यक्त केले. तर ॲड. राजीव बिले यांनी शासनाच्या दारूबंदी विभागाच्या अधिकारांवर भाष्य करताना दारूबंदी विभागाचा उद्देश, दारूची विक्री व दारू पिण्याच्या परवान्यांतील विसंगतीवर मिश्कील शैलीत भाष्य केले. आपल्याकडे दारू ठेवण्याचा परवाना असूनही आपण आजपर्यंत एकही थेंब दारू प्राशन केलेली नाही, हा अनुभव त्यांनी विनोदी पद्धतीने सांगून उपस्थितांची मने जिंकली.
तसेच दारूसोबतच अमली पदार्थ सेवन तरुण वर्गात वाढत असल्याबद्दल त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. हे आपल्या तरुण पिढीला कमकुवत करण्यासाठीचे परकीय षड्यंत्र असल्याचे सांगत, भारतावर प्रेम व्यक्त करणाऱ्या तरुणांनी अशा चालींना बळी पडू नये, असे परखड प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.कुडाळ येथे कार्यरत असलेल्या अँटी-ड्रग्स ग्रुपप्रमाणेच अणाव परिसरात कुठेही अनुचित प्रकार जाणवल्यास समितीच्या निदर्शनास आणावे व ड्रग्सविरोधी मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी समाजाला केले. या कार्यक्रमात ज्या व्यक्तींनी दारू विरोधी प्रबोधनाच्या परिणामामुळे दारू सोडली, त्यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच घरगुती समारंभांमध्ये, विशेषतः हळदीच्या कार्यक्रमात होणाऱ्या दारू वाटपाच्या प्रथेला कृतीतून विरोध करणाऱ्या तडफदार कार्यकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक देखील यावेळी करण्यात आले.
‘छोट्या छोट्या कृतीतून मोठा सामाजिक बदल घडू शकतो.’ या विचारातून स्थापन झालेल्या दारूचे दुष्परिणाम जनजागृती समितीत अध्यक्ष संदिप परब, उपाध्यक्ष अनिल पालव,सचिव उमेश पटवर्धन, सहसचिव सहदेव पाटकर, खजिनदार दिपक नांदीवडेकर, सहखजिनदार राजन परब, सल्लागार सरपंच लीलाधर अणावकर तसेच सदस्य सिताराम परब, नरेश परब, अनिकेत पाटकर, मंदार माड्ये, गौरव आंगणे, तुषार पाटील, धाकू जाधव, अमोल परब, आनंद सुपल, प्रसाद आंगणे,निखिल सोनार, अजित अणावकर, तुषार आंगणे, अविनाश अणावकर, विष्णू अणावकर, दीपक अणावकर, नरेंद्र परब, नरेश आंगणे, प्रतीक परब आदींनी वर्षभर उल्लेखनीय कार्य केले असून ते निश्चितच कौतुकास्पद व आदर्शवत आहे. यातील काही कार्यकर्त्यांनी तर थेट रूढी-परंपरांतील दारू वाटपाला ठाम विरोध करून आपल्या कृतीतून सामाजिक निष्ठा व्यक्त केली आहे. “केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे” या उक्तीची प्रचिती दारूचे दुष्परिणाम जागृती समिती, अणाव यांनी आपल्या कार्यातून सर्वांसमोर आणून दिली आहे.












