कोल्हापूरमध्ये काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष ठरला, कोल्हापूरची महापालिका सतेज पाटील यांच्या हातून निसटली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीविरुद्ध काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यात थेट लढत होती. मात्र, पाटील यांनी एकहाती मैदान मारताना तब्बल 37 जागा निवडून आणल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाला केवळ एक जागा मिळाल्याने केवळ तीन जागांमुळे कोल्हापूरची महापालिका सतेज पाटील यांच्या हातून निसटली आहे.

कोल्हापूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसच्या खात्यामध्ये 37 जागा आहेत. भाजपच्या खात्यामध्ये 24 जागा आहेत. शिवसेना शिंदे गट 14 जागांवर राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या. जनसुराज्यने एक जागा जिंकली. कोल्हापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाटी कोरी राहिली. महायुतीच्या प्रचारामध्ये दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दिग्गज नेते प्रचारात उतरूनही सतेज पाटील यांनी काँग्रेससाठी मिळवलेलं यश लक्षणीय आहे. कोल्हापूर महानगरपालिका आणि ही अशी एकमेव महापालिका होती ज्या ठिकाणी महायुती झाली होती. काँग्रेसने 81 पैकी 75 जागांवर उमेदवार होते. यामध्ये काँग्रेसचे 37 उमेदवार विजयी झाले. शिवसेना ठाकरे गटाचा केवळ एक उमेदवार विजयी झाला.

दुसरीकडे महायुतीमध्ये पण भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपला 24 जागा मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाला 14 जागा मिळाल्या, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिडोर्ले जे काँग्रेसकडून पुरस्कृत होते ते सुद्धा पराभूत झाले. कोल्हापूरची लढत उत्तरोत्तर सतेज पाटील विरुद्ध महायुती अशीच झाली होती. पाटील यांना रोखण्यासाठी महायुतीकडून मोठा डाव टाकण्यात आला. सतेज पाटील यांनी रस्त्यावर उतरून प्रचाराची धुरा सांभाळली होती. ‘कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं’ त्या पद्धतीने कॅम्पेन राबवण्यास सुरुवात केली होती. यानंतर पाटील यांच्या कॅम्पेनमागून महायुती जाताना दिसून आली. पाटील रस्त्यावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापुरात प्रचाराला यावं लागलं. भाजप प्रदेशाध्यक्ष सुद्धा प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आले होते.

error: Content is protected !!