विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ, कणकवली यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘माघी गणेश जयंती २०२६’ विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे यंदाचे १७ वे वर्ष असून, दि. २१ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध धार्मिक विधी, भजन व दशावतार लोककलेचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले आहे.
बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री गणेशमूर्तीचे आगमन होणार आहे. गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा, सकाळी ८ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी १०.३० वाजता महाआरती होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून तीर्थप्रसाद व दुपारी १ ते ३ दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता श्री मेजारेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नागवे येथील बुवा अमेय आर्डेकर यांचे भजन, सायंकाळी ४.३० वाजता श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, जानवली येथील बुवा रवी राणे यांचे भजन, सायंकाळी ५.३० वाजता श्री राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ, जानवली येथील बुवा उदय राणे यांचे भजन आणि सायंकाळी ६.३० वाजता आई जयंती देवी प्रासादिक भजन मंडळ, पळसंब यांचे दिंडी भजन सादर होणार आहे तर रात्री ८.३० वाजता महाआरती होईल.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून रात्री ९.३० वाजता गुरुकृपा दशावतार लोककला नाट्यमंडळ, हळवल यांचा ‘खरी पतिव्रता’ हा महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. कोकणचा बाळगंधर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओमप्रकाश चव्हाण यांचा सहभाग हे यातील आणखी एक आकर्षण ठरणार आहे. शुक्रवार दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री गणरायाची सवाद्य विसर्जन मिरवणूक सिंधुगर्जना ढोलपथक, कणकवली यांच्या तालावर पार पडणार आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.












