• डॉ. रुपेश पाटकर

…….
एका अनौपचारिक चर्चेदरम्यान मी एका मित्राकडे व्यक्त केले की माझ्या बालपणीच्या धार्मिक संस्कारांमुळे मी आयुष्यात आतापर्यंत दोन गोष्टी कधीच करु शकलो नाही. एक दारुसारख्या मादक पदार्थाची चव घेणे आणि दुसरे बीफ खाणे. त्यावर तो चेष्टेने म्हणाला, ‘म्हणजे तू गोमातावाला आहेस तर!’

‘हो!’ सहज म्हणून गेलो.
‘एकीकडे तू स्वतःला प्रागतिक विचारांचा म्हणवतोस आणि दुसरीकडे गाईला गोमातादेखील म्हणतोस?’ त्याने विचारले.

‘गाईला मी नुसतेच गोमाता म्हणत नाही, गायीविषयीचा माझा भाव कायम मातेचाच राहीला आहे,’ मी म्हणालो.
‘तुला बैलोबा म्हणणेच योग्य होईल तर!,’ तो म्हणाला.

‘तू मला बैलच नव्हे तर रेडादेखील म्हणू शकतोस,’ माझ्या या शांतपणे दिलेल्या उत्तरावर त्याने माझ्याकडे अशा तर्‍हेने पाहिले की त्याला माझ्या शहाणपणावरच संशय आला होता.

मी पुढे म्हणालो, ‘बालपणी माझ्यावर हा संस्कार झाला की ‘दूध’ हे वात्सल्याचे प्रतिक आहे. निरपेक्ष मातृत्वाचे प्रतिक आहे. आईच्या दूधानंतर मी बालपणी गाईच्या दुधावर पोसलो. म्हणून गाय ही माझी माता आहे,’ मी म्हणालो.
‘मग म्हैस तुला माता वाटत नाही काय?’ त्याने खवचटपणे विचारले.

‘ज्या कोणा प्राण्याचे दूध मी आजपर्यंत प्यायलो, तो प्रत्येक प्राणी माझ्यासाठी मातृवत आहे. त्यामुळे म्हैसदेखील माझी माता आहे!’ मी म्हणालो.

‘तू खुळचट आहेस,’ तो म्हणाला.

‘आपल्या करुणेचा विस्तार माणसाच्या पलीकडील जीवमात्रांपर्यंत करणे जर तुझ्या व्याख्येत खुळचटपणा असेल तर मी जरुर खुळचट आहे. निर्दयी शहाणपणापेक्षा खुळचट करुणामयता मला पसंत आहे!’ मी म्हणालो.
……

डॉ. रुपेश पाटकर

error: Content is protected !!