कणकवली (प्रतिनिधी) : कासार्डे दक्षिण गावठाण येथील घरालगतच्या मांगरात बंदी असलेला व शारिराला घातक असलेला ४६ हजार रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात बाळगल्याप्रकरणी आदिनाथ महावीर कऱ्हाडे याची तदर्थ अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. इस. इंदलकर यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
१८ एप्रिल २०२४ रोजी स्थानिक गुन्हा अन्वषण शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक आर. बी. शेळके यांच्या पथकाने कासार्डे दक्षिण गावठाण येथे आरोपीच्या घरालगत असलेल्या खोपीमध्ये छापा टाकला. यावेळी विमल पानमसाला व तंबाखु यांचा ४६ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल आढळला. याबाबत पंचासमक्ष पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार राजेंद्र जामसंडेकर यांच्या फिर्यादीनुसार आरोपीवर भादंवि कलम ३२८ सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६तील तरतूदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, संशयास्पद घटनास्थळ पंचनामा तसेच गुटख्याबाबत कायदेशिर पुरवा न आल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.












