करूळ धरण दुर्घटना : तिन्ही मुलींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ जामदारवाडी येथील धरणात बुडून मृत्युमुखी पडलेल्या तिन्ही मुलींवर गुरुवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी अश्रुपूर्ण नयनानी त्यांना श्रद्धांजली वाहिली. या दुर्दैवी घटनेमुळे करूळ व कुसूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

करूळ येथील धरणावर बुधवारी सायंकाळी सात मुले आंघोळीसाठी गेली होती. यावेळी तन्वी अनंत माळकर (वय 16, रा. करूळ), स्वरा संदीप सुर्वे (वय 11, रा. कुसूर) व ऋतिका संतोष पाटील (वय 18, रा. करूळ) या तिघी अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या आणि तिघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला.तिन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बुधवारी रात्री वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. दरम्यान, सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व डीवायएसपी घनश्याम आढाव यांनी रुग्णालयाला भेट देत घटनेची माहिती घेतली.

गुरुवारी सकाळी शवविच्छेदनानंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. तन्वी माळकर व ऋतिका पाटील यांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून करूळ भोयडेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले. तर स्वरा सुर्वे हिचा मृतदेह कुसूर येथील निवासस्थानी नेण्यात आला. तन्वी व ऋतिका यांच्यावर करूळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तर स्वरा सुर्वे हिच्यावर कुसूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत तन्वी माळकर हिच्या पश्चात आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. ऋतिका पाटील हिच्या पश्चात आई, चुलते, भाऊ व बहीण असा परिवार आहे. तर स्वरा सुर्वे हिच्या पश्चात आई-वडील व बहीण असा परिवार आहे.

error: Content is protected !!